कोलंबो : क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. इंग्लंड आणि श्रीलंका बोर्ड इलेव्हन या मॅचवेळी श्रीलंकेचा खेळाडू पाथुम निशांकाच्या डोक्याला बॉल लागला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निशांका फिल्डिंग करत असताना शॉर्ट लेगवर उभा होता. ऑफ स्पिनर निशान पेरिसच्या बॉलिंगवर जॉस बटलरनं मारलेला शॉट निशांकाच्या डोक्याला लागला. निशांकानं हेल्मेट घातलं होतं, तरी तो बॉल लागल्यामुळे जमिनीवर कोसळला.
तेवढ्यात इंग्लंड टीमचे डॉक्टर मोईज मोघाल मैदानात आले. निशांका जवळपास २० मिनिटं काहीच बोलला नाही. निशांकाला दुखापत झाल्यामुळे मॅच २० मिनिट थांबवण्यात आली होती. यानंतर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं. निशांकानं गळ्याला दुखापत झाल्याची तक्रार केली होती.
निशांका सध्या ठिक असून शुद्धीत आहे. चिंता करण्याचं कारण नाही. त्याचं एमआरआय स्कॅन करण्यात आलंय. त्यामुळे आतमध्ये रक्तस्त्राव झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी प्रतिक्रिया बोर्ड अध्यक्ष इलेव्हन टीमचे प्रशिक्षक अविशका गुणवर्दने यांनी दिली आहे.
१९९८ साली भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांच्या डोक्याला बांगलादेशच्या बॉलरचा बॉल लागला होता. या अपघातात लांबा यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी लांबा ३८ वर्षांचे होते. १९५८-५९ मध्ये कायदे आजम ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा विकेट कीपर अब्दुल अजीजच्या छातीला बॉल लागला. मैदानातच अजीज बेशुद्ध पडला. रुग्णालयात नेत असताना १७ वर्षाच्या अजीजचा मृत्यू झाला.
१९६१-६२ दरम्यान भारताचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी टाकलेला बॉल वेस्ट इंडिजचे फास्ट बॉलर चार्ली ग्रिफीथ यांच्या डोक्याला लागला. यानंतर ग्रिफीथ यांच्या डोक्याची लगेचच शस्त्रक्रिया करण्यात आली. पण यानंतर ग्रिफीथ कधीच क्रिकेट खेळू शकले नाहीत.
२०१२ साली समरसेटविरुद्ध खेळताना डोळ्याला जखम झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर मार्क बाऊचरला क्रिकेटमधून संन्यास घ्यावा लागला होता.
२६ नोव्हेंबर २०१४ साली ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल्प ह्यूज याचा मैदानातल्या अपघातामुळे मृत्यू झाला होता.