T20 world cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्डकपला (T20 World Cup 2022) सुरुवात होणार आहे. भारतीय संघ (Team India) यंदाही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे. टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. यातच भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाबाबत भाकीत केले आहे. भारत पुन्हा एकदा टी-20 विश्वविजेता (T20 Champions) बनू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
सुनील गावस्कर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, 'भारतीय संघ टी-20 विश्वचषक जिंकू शकतो. मला खात्री आहे की प्रत्येक संघाला नशिबाची गरज असते. भारतीय संघ ट्रॉफी आणू शकतो. 15 वर्षांपूर्वी भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता. मात्र, त्यानंतर टीम इंडियाला या छोट्या फॉरमॅटमध्ये कधीही चॅम्पियन बनता आलेले नाही. यावेळी रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने उतरणार आहे.
गावसकर यांनी संघ निवडीबाबतही प्रतिक्रिया दिली. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर शमी अधिक प्रभावी ठरू शकतो का, असे विचारले असता ते म्हणाले की, ‘एकदा संघ निवडला की तो आपला भारतीय संघ असतो. आपण त्याला साथ दिली पाहिजे. संघ निवडीवर आपण प्रश्न उपस्थित करू नये की एखाद्या खेळाडूला का वगळण्यात आले किंवा एखाद्याला संघाचा भाग का बनवले गेले. यामुळे खेळाडूंचे मनोबलही खचते.
भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. आशिया चषक-2022 मध्ये, भारताने साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत केले परंतु सुपर-4 फेरीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा चुरशीचा आणि रोमांचक सामना होणं अपेक्षित आहे. यानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि रवी बिश्नोई.