T20 World Cup : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकेत (America) यंदाचा टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यासाठी लवकरच टीम इंडियाची (Team India) घोषणा केली जाणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वात भारतीय निवड समितीची बैठक या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला होण्याची शक्यता आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी आयसीसीने (ICC) संघ घोषित करण्याची डेडलाईन 1 मे ठेवली आहे. म्हणजे या तारखेपर्यंत सर्व 20 देशांना आपला संघ जाहीर करावा लागणार आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांचंही टीम इंडियाची घोषणा कधी होणार याकडे लक्ष लागलं आहे.
टीम इंडियात फलंदाज
टीम इंडियात फलंदाज म्हणून कर्णधार रोहित शर्मा, विराट कहोली आणि टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवची निवड जवळपास निश्चित आहे. तर सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंहलाही टी20 वर्ल्ड कपचं तिकिट मिळू शकतं. यशस्वीने गेल्या काही सामन्यात संघाला दमदार सुरुवात करुन दिली आहे. तर रिंकू सिंहने फिनिशरची भूमिका निभावली आहे.
टीम इंडियात विकेटकिपर
टीम इंडियात विकेटकिपरसाठी जोरदार चुरस आहे. अपघातानंतर तब्बल 14 महिन्यांनी आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या ऋषभ पंतने आतापर्यंत झालेल्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसमननेही आक्रमक फलंदाजी करत आपलं लक्ष वेधून घेतलं आहे.
टीम इंडियात ऑलराऊंडर
टीम इंडियात ऑलराऊंडरसाठी निवड समितीसमोर पहिलं नाव असेल ते हार्दिक पांड्याचं. हार्दिक आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सांभाळतोय. ऑलराऊंडर रवींद्र जडेजाची निवडही जवळपास निश्चित मानली जात आहे. जडेजला अक्षर पटेलचं आव्हान असेल. आयपीएलमधल्या कामगिरीचा विचार केला तर सध्या शिवम दुबेचं पारडं जड आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या शिवम दुबेने दमदार कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे.
टीम इंडियात फिरकी गोलंदाज
टीम इंडियात स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज म्हणून चायनामन कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलची निवड निश्चित आहे. आयपीएल 2024 मध्ये लेग स्पिनर युजवेंद्र चहल सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. इतकंच नाही तर भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटही चहलच्या नावावर आहेत. टी20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिकत होणार आहे, इथल्या खेळपट्ट्या धीम्या असतात. त्यामुळे कुलदीप आणि चहलची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
टीम इंडियात वेगवान गोलंदाज
वेगवान गोलंदाजांमध्ये टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचं स्थान निश्चित आहे. जसप्रीत बुमराहच्या जोडीला अर्शदीप सिंगची साथ मिळू शकते. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजला संधी मिळू शकतो. पण सिराज यंदाच्या आयपीएलमध्ये सपशेल फ्लॉप ठरला आहे. याशिवाय लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवलाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
टी20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, मोहम्मद सिराज.
हे खेळाडूही दावेदार : केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, मयंक यादव, शुभमन गिल, रियान पराग, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, मुकेश कुमार