T20 World Cup Super-8 India Scheduled : आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आता सुपर-8 चा थरार सुरु होईल. सुपर-8 मध्ये पोहोचणारे 8 संघही निश्चित झाले आहेत. 'ग्रुप ए'मधून टीम इंडिया Team India) सात पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर राहिली. तर पाकिस्तानला मागे टाकत ग्रुप ए मधून दुसरा संघ म्हणून अमेरिका क्वालीफाय झाला आहे. आता सुपर-8 (Super-8) मध्ये चार संघांचे दोन ग्रुप करण्यात आले असून भारतीय संघाचा ग्रुप-1 मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये टीम इंडियाशिवाय ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे. 19 जूनपासून सुपर-8च्या सामन्यांना सुरुवात होईल.
ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया टॉपवर होती. तर ग्रुप सीमध्ये अफगाणिस्तान पहिल्या स्थानावर होती. बांगलादेशच्या संघानेही यावेळी कमाल करत सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये धडक मारलीय. ग्रुप-डी मध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर तर बांगलादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघाचं सुपर-8 वेळापत्रक
भारतीय संघाच्या सुपर-8 सामन्यांना 20 जूनपासून सुरुवात होईल. टीम इंडियाचा पहिला सामना 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध रंगेल. हा सामना बारबाडोसमध्ये खेळवला जाईल. तर 22 जूनला टीम इंडिया आणि बांगलादेश आमने सामने असतील. हा सामना एंटिग्वामध्ये रंगेल. तर 24 जूनला सेंट लुसियामध्ये भारत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाकडे असणार आहे.
टीम इंडियाचे खेळाडू फॉर्मात
टीम इंडियाचे गोलंदाज सध्या चांगलेच फॉर्मात आहेत. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज या वेगवान चौकडीने मिळून टी20 वर्ल्ड कपच्या तीन सामन्यात तब्बल 20 विकेट घेतल्या आहेत. आता टीम इंडियाचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत. विंडीजच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीला मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना याचा फायदा होणार आहे.
टीम इंडियाची फलंदाजी थोडी चिंतेचा विषय आहे. विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा निर्मय सपशेल फसला आहे. ग्रुपच्या तीन सामन्यात विराट कोहलीला एकदाही दुहेरी धावा करता आलेल्या नाहीत. अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या बॅटमधूनही धावांचा ओघ आटला आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज