T20 World Cup : हैदराबादच्या 'या' खेळाडूचं पालटलं नशीब, थेट टीम इंडियासाठीचे उघडले दरवाजे

वेगवान बॉलिंगचं मिळालं बक्षीस, हैदराबादच्या युवा खेळाडूला टीम इंडियात संधी

Updated: Oct 9, 2021, 11:07 PM IST
T20 World Cup : हैदराबादच्या 'या' खेळाडूचं पालटलं नशीब, थेट टीम इंडियासाठीचे उघडले दरवाजे  title=

मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामात (IPL 2021) सर्वात वेगवान चेंडू टाकून सनरायजर्स हैदराबादचा (SRH) युवा गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. आता या कामगिरीचं मोठं बक्षीस उमरान मलिकला मिळालं आहे. जम्मू-काश्मिरच्या (Jammu-Kashmir) या वेगवान गोलंदाजाला आगामी टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2021) थेट टीम इंडियात (Team India) संधी मिळाली आहे. उमरान मलिक नेट गोलंदाज (Net Bowler) म्हणून भारतीय टीमबरोबर असणार आहे.

आयपीएलमध्ये उमटवली छाप

आपल्या वेगवान गोलंदाजीने उमरान मलिकने आयपीएलमध्ये आपली छाप उमटवली आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीचा भारतीय फलंदाजाना सरावात मोठा फायदा होणार आहे. शिवाय उमरान मलिकसाठीही हा चांगला अनुभव असणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मासारख्या भारताच्या सध्याच्या दिग्गज खेळाडूंबरोबर सराव करण्याची संधी उमरान मलिकसाठी भविष्यात उपयुक्त ठरणार आहे. 

विराट कोहलीकडून कौतुक

आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर (RCB) चुरशीच्या लढतीत चार धावांनी मात केली होती. पण या सामन्यानंतर पराभव विसरून विराट कोहलीने (Virat Kohli) उमरान मलिकच्या गोलंदाजीचं कौतुक केलं होतं आणि त्याला ऑटोग्राफही दिला. 

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील वेगवान गोलंदाज

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यात उमरानने 152.95 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. आयपीएल 2021 चा हा सर्वात वेगवान चेंडू होता. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने 152.75 च्या वेगाने एक चेंडू टाकला होता. आरसीबीच्या डावात 9व्या ओव्हरमध्ये, मलिकने 150 kmph किंवा त्याहून अधिक वेगाने सलग पाच बॉल टाकले. (Fastest Delivery Of IPL 2021)