T20 WORLD CUP: भारतीय संघातून डच्चू, आयपीएलमध्ये कमाल, निवड समिती निशाण्यावर

आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या शिखर धवनलाही T20 संघात स्थान मिळालेलं नाही

Updated: Sep 27, 2021, 07:38 PM IST
T20 WORLD CUP: भारतीय संघातून डच्चू, आयपीएलमध्ये कमाल, निवड समिती निशाण्यावर

मुंबई : युएईमध्ये (UAE) खेळला जात असलेला आयपीएलचा (IPL 2021) दुसरा हंगाम टीम इंडियातील (Team India) अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे.  पुढील महिन्यात T20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2021) यूएईमध्येच आयोजित केला जाणार आहे आणि यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय निवड समितीने 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. तर तीन खेळाडूंना राखीव ठेवण्यात आलं आहे.

T20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारतीय संघातील काही महत्त्वाच्या खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. यापैकीच एक म्हणजे फिरकीपटू यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal). आयपीएलमध्ये रविवारी मुंबई इंडियान्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून (RCB) खेळताना दमदार कामगिरी करत चहलने निवडकर्त्यांना चांगलंच उत्तर दिलं. इतकंच नाही तर चहलचा सध्याचा फॉर्म बघता आयपीएलमधल्या दोन टीमच्या खेळाडूंनी चहलचं समर्थन केलं आहे. 

T20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात यजुवेंद्र चहलच्या जागी मुंबई इंडियन्सकडून खेळणारा युवा फिरकीपटू राहुल चहरला संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये यजुवेंद्र चहलने दमदार कामगिरी करत आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चहलने 3 विकेट घेतल्या. तर मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या राहुल चहरला केवळ 1 विकेट घेता आली. 

हरभजन सिंगने मारला टोमणा

दुबईच्या खेळपट्टीवर चहलने क्विंटन डी कॉक आणि टीम इंडियासोबत असलेल्या इशान किशनची विकेट घेत बंगलोरच्या विजयाचा मार्ग सोपा केला. अनुभवी भारतीय ऑफस्पिनर आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य हरभजन सिंग यानेही चहलच्या या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे. हरभजनने ट्वीट करत म्हटलंय, 'मित्रांनो, चहलने आज वेगवान गोलंदाजी केली की धीमी? 4-11-3 किती जबरदस्त स्पेल चॅम्पियन युझवेंद्र चहल'

वास्तविक भज्जीची ही टिप्पणी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या वक्तव्यावर टोमणे मारणारी होती. संघाच्या निवडीनंतर चेतन शर्मा म्हणाले होते की, चहलपेक्षा राहुलला प्राधान्य देण्यात आले आहे कारण चहरचे चेंडू चहलपेक्षा वेगवान आहेत.

दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाची टीका

केवळ हरभजनच नाही तर दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी संपूर्ण निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. शिखर धवन आणि चहलच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधत त्यांनी दोन ट्वीट केले. जिंदाल यांनी लिहिलंय, 'निवडकर्त्यांनाही त्यांच्या निर्णयामुळे धक्का बसला असेल, भारताच्या टी -20 संघात सर्वोत्तम फलंदाज नाही, कोण असेल अंदाज लावा?' जिंदाल यांनी यात दिल्ली कॅपिटल्सला टॅग केलं आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, टी20 संघात भारताचा सर्वश्रेष्ठ फिरकीपटूपण गायब आहे, हे ट्विट त्यांनी RCB ला टॅग केलं आहे. 

निवड समितीवर सवाल

यजुवेंद्र चहलप्रमाणेच भारताचा धडाकेबाज ओपनर शिखर धवनलाही टी20 संघात स्थान मिळालेलं नाही. धवन आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असून या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. धवनच्या जागी इशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पृथ्वी शॉ आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेले श्रेयस अय्यरही संघात स्थान मिळवू शकले नाहीत. दुखापतीतून परतलेल्या अय्यरला मात्र राखीव ठेवण्यात आलं आहे.