Virat Khohli Instagram : WTC अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण, तिथंही संघातील काही खेळाडू मात्र वेगळ्याच कारणानं चर्चेचा विषय ठरले. एकिकडे अनेकांनी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर दुसरीकडे विराटच्या आक्रमक शैलीतील कर्णधारपदाची इथं गरज होती असं बोलणारेही कमी नव्हते. या साऱ्यामध्ये विराट मात्र त्याच्याच आयुष्यात रमलेला दिसला.
क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या विराटनं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणं सुरुच ठेवलं. त्यातच त्याची अशी एक पोस्ट समोर आली, ज्यामुळं या खेळाडूच्या मनात नेमका कोणता काहूर माजलाय? हाच प्रश्न अनेकांना पडला.
भारतीय संघ सध्या विश्रांतीवर असतानाच आगामी वेस्ट इंडिज दौरा केंद्रस्थानी ठेवत विराट मात्र वेगळीच तयारी करताना दिसत आहे. त्याची इन्स्टाग्राम स्टोरी हेच सांगतेय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर विराटनं इन्स्टाग्रामवर जे काही शेअर केलं ते त्याच्या कोट्यवधी चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी पाहिलं.
विराटची ही स्टोरी कोणाचा फोटो किंवा कोणती प्रतिक्रिया नसून तो आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देणारा एक QUOTE होता. 'मन कायम साशंक असतं. हृदय मात्र विश्वासावर जगतं. विश्वास हा तो पूल आहे जो मस्तर असणाऱ्या मनापासून स्वातंत्र्याच्या मार्गावर नेतो...', हेच ते शब्द.
विराटनं शेअर केलेली ही स्टोरी त्याच्या जीवनातील एखाद्या प्रसंगावर भाष्य करण्यासोबतच इतरांनाही थोडक्यात खूप काही सांगून जात आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये अशी एखादी वैचारिक आणि पटण्याजोडी बाब शेअर करण्याची विराटची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यानं अशीच एक पोस्ट शेअर केली होती. जिथं त्यानं इंग्रजी लेखक आणि वक्ता अॅलन विल्सन यांचा एक QUOTE शेअर केला होता. 'बदलातून अर्थ काढण्याचा एकमेव पर्याय म्हणजे त्यामध्ये डुंबणं, त्याच्यासोबत चालणं आणि त्याच्यासोबत डुलणं', अशा आशयाचे ते शब्द होते.
फक्त असे Inspirational QUOTE नव्हे, तर विराट इन्स्टा स्टोरीमध्ये काही असे फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर करताना दिसतो जिथून त्याच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची संधीच अनेकांना मिळते. सहसा या माध्यमातून तो मन मोकळं करताना दिसतो. त्यामुळं आता नुकतीच शेअर केलेली विराटची स्टोरी नेमकं काय सांगू पाहतेय हे येता काळच ठरवेल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तेव्हा, विराटच्या मनात नेमकं काय आहे ते फक्त तोच जाणतो. पण, येत्या काळात त्यानं भरपूर क्रिकेट खेळावं आणि नवनवीन विक्रमांची नोंद करावी हीच क्रिकेटप्रेमींची इच्छा.