मुंबई : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात आजपासून 3 सामन्यांची टी-20 सिरीज सुरु होत आहे. सीरीजचा पहिला सामना आज कोलकातामध्ये खेळला जाणार आहे. भारतीय टीमने याआधी टेस्ट सीरीज 2-0 आणि वनडे सीरीज 3-1 ने जिंकली आहे. आजच्या सामन्यात टीम इंडिया कर्णधार विराट कोहली आणि विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीच्या विना मैदानात उतरणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा टीमचा कर्णधार असेल.
या सामन्यात धोनीच्या जागी युवा खेळाडू ऋषभ पंत विकेटकीपिंग करणार आहे. तर ऑलराउंडर क्रुणाल पंड्या आणि खलील अहमद यांच्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्यात डेब्यू करण्याची संधी आहे. हा सामना ईडन गार्डनमध्ये होणार आहे. विराट कोहलीला टी20 सिरीजसाठी आराम देण्यात आला आहे. तर एमएस धोनीला टीममध्ये संधी नाही मिळाली आहे. धोनीच्या जागी पंत आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली आहे.
भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील टी 20 सीरीज ही वेगळी ठरु शकते. कारण वेस्टइंडीजची टीम टी20 मध्ये चांगली कामगिरी करते. त्यामुळे टी20 मध्ये मोठी टक्कर पाहायला मिळू शकते. तर भारत देखील क्लीन स्विप देण्याचा प्रय़त्न करेल. टी20 सिरीजचा दुसरा सामना 6 नोव्हेंबरला लखनऊमध्ये तर तिसरा सामना 11 नोव्हेंबरला चेन्नईमध्ये होणार आहे.