पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडिया घाबरली होती! इन्झमाम उल हकनं डिवचलं

सामना संपून महिना उलटल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया सुरुच आहेत

Updated: Nov 26, 2021, 10:56 PM IST
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडिया घाबरली होती! इन्झमाम उल हकनं डिवचलं

नवी दिल्ली : दुबईत नुकत्याच झालेल्या ICC T20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup 2021) मध्ये टीम इंडियाला (Team India) पाकिस्तानकडून (Pakistan) 10 गडी राखून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागलं होतं. या सामन्यावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इन्झमाम-उल-हकने (Inzamam-Ul-Haq) आपली प्रतिक्रिया दिली आहे.

24 ऑक्टोबरला यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी टीम इंडिया खूप दडपणाखाली होती, असं इन्झमानने म्हटलं आहे.

टीम इंडिया घाबरली होती
इंझमाम-उल-हकने पाकिस्तानी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, मला वाटतं की या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघ घाबरला होता. 
टॉसच्यावेळी बाबर आझम आणि विराट कोहलीची देहबोली पाहिली तर कोण दडपणाखाली होते हे लगेच समजेल.

या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंपेक्षा पाकिस्तानी संघातील खेळाडूंची देहबोली सकारात्मक होती. सलामीला आलेला रोहित शर्मा स्वत: दडपणाखाली होता, हे स्पष्टपणे दिसून येत होतं, असं इन्झमामने म्हटलं आहे.

भारतीय टीमवर दबाव ठेवला
आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारतीय संघ कधीच असा खेळला नव्हता, जसा या सामन्यात पाकिस्तान संघाविरुद्ध खेळत होता. टीम इंडिया टी20 क्रिकेटमधला एक चांगला संघ आहे यात शंका नाही, गेल्या 2-3 वर्षातील टीम इंडियाचा रेकॉर्ड पाहिला तर विश्वचषकात भारतीय संघाची दावेदारी मजबूत होती. पण पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ते इतके दडपणाखाली आले कि त्यातून ते वर येऊ शकले नाहीत, असं इन्झमाम उल हकने म्हटलं आहे.