महिला हॉकी आशिया चषक : भारतीय संघ अंतिम फेरीत, घेणार चीनचा बदला

महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. जपानचा पराभव करत थेट अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत चीनशी लढत होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 3, 2017, 05:56 PM IST
महिला हॉकी आशिया चषक : भारतीय संघ अंतिम फेरीत, घेणार चीनचा बदला title=

 काकामिघारा : महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. जपानचा पराभव करत थेट अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत चीनशी लढत होणार आहे.

जपानच्या काकामिघारा येथे ही स्पर्धा सुरु आहे. भारताच्या महिलांनी चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने गतविजेत्या आणि यजमान जपानचा ४-२ अशा गोलने पराभव केला.  

राणी रामपालच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने पहिल्यापासून जपानवर दबाव निर्माण केला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला गुरजीत कौरने गोल करत  भारताला खाते उघडून दिले. त्यानंतर नवव्या मिनिटाला गुरजीत कौरने दुसरा आणि नवज्योत कौरने तिसरा गोल करत जपानला दे धक्का दिला.

जपानच्या शिहो त्सुजीने १७व्या मिनिटाला  पहिला गोल केला. तर युई इशीबाशीने २८ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. मध्यांतरापर्यंत भारताकडे ३-२ अशी आघाडी होती. त्यानंतर तिसऱ्या सत्रातही भारतीय महिलांची चांगली करत ३८व्या मिनिटाला गोल केला आणि ४-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर एकही गोल झाला नाही.

आता फायनल रविवारी चीन विरुद्ध होणार आहे. २००९मध्ये झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात चीनने भारताचा ५-३ असा पराभव केला होता. त्यामुळे आता चीनचा बदला घेण्याची भारतीय महिलांना संधी आहे.