DRS वरून पुन्हा एकदा हंगामा; नवखा खेळाडू थेट अंपयारशीच भिडला!

सामन्यात कोलकात्याच्या खेळाडूने हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान डीआरएस न मिळाल्याने अंपायरशी वाद घातला.

Updated: May 15, 2022, 10:28 AM IST
DRS वरून पुन्हा एकदा हंगामा; नवखा खेळाडू थेट अंपयारशीच भिडला! title=

मुंबई : क्रिकेटमध्ये डीआरएस प्रोसेस गेमजेंचर ठरू शकते. डीआरएसच्या पर्यायाचा वापरायचा की नाही हे ठरवण्यासाठी 15 सेकंदांचा अवधी दिला जातो. दरम्यान डीआरएसवरून अनेकदा खेळाडू आणि अंपायरमध्ये बाचाबची होत असल्याचं समोर येतं. असंच काहीसं प्रकरण कालच्या सामन्यात समोर आलं आहे. 

काल रात्री कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात असाच प्रकार पाहायला मिळाला. या सामन्यात कोलकात्याच्या रिंकू सिंगने हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान डीआरएस न मिळाल्याने अंपायरशी वाद घातला.

14 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सची फलंदाज रिंकू सिंग मैदानावरील अंपायरशी भिडताना दिसला. नाईट रायडर्सच्या 12व्या ओव्हरमध्ये केन विल्यमसनने टी नटराजनला गोलंदाजी दिली होती. 

या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर रिंकू सिंगला मोठा शॉर्ट खेळायचा होता, पण चेंडू त्याच्या पॅडला लागला आणि त्यानंतर अंपायरने रिंकूला एलबीडब्ल्यू आऊट करार दिला. 

रिंकू रिव्ह्यूसाठी अपील करणार इतक्यात नॉन-स्ट्रायकरवर उभा असलेल्या सॅम बिलिंग्सने रिव्ह्यूसाठी अपील केलं, मात्र  अंपायरने ते नाकारलं. यानंतर रिंकू सिंगला रिव्ह्यू घ्यायचा होता, पण तोवर 15 सेकंद उलटून गेले होते. यावरून अंपायर आणि रिंकू यांच्यात बराच वेळ वाद सुरू होता. यावरून रिंकू सिंग बराच वेळ मैदानावर उभा राहिला, पण कॅप्टन केनने घातलेल्या समजूतीनंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला.