मुंबई : भारताला 2012 मध्ये विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू आता अॅरोन फिंचच्या संघातून खेळताना दिसणार आहे. आपल्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील विश्वचषक (Under 19 World Cup) जिंकून देणारा उन्मुक्त चंदने ऑगस्टमध्ये निवृत्ती जाहीर केली होती. भारतात उन्मुक्त चंदच्या (Unmukt Chand) क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात अगदी दणक्यात झाली. पण तितक्याच वेगाने कारकिर्दीला उतारही लागला. पण आता उन्मुक्त चंद ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना दिसणार आहे.
उन्मुक्त चंदने नुकतंच अमेरिकन लीगमध्ये धमाकेदार कामगिरी केली. याचं बक्षीस म्हणून ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) त्याला संधी मिळाली असून मेलबर्न रेनेगेडस संघातून खेळणार आहे. या संदर्भातली माहिती फ्रेंचाइजीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. मेलबर्न संघाचा कर्णधार ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच आहे.
उन्मुक्त चंद बिग बॅश लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटर आहे. BCCI च्या नियमांनुसार भारतीय खेळाडूंना IPL शिवाय इतर कोणत्याही परदेशी T20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. उन्मुक्तची स्थानिक क्रिकेटमधली कामगिरी लक्षणीय आहे. पण भारतीय क्रिकेट संघात आपलं स्थान पक्कं करण्यात तो यशस्वी ठरला नाही. यानंतर त्याने निवृत्ती जाहीर करत अमेरिकेला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
Big news... @UnmuktChand9
The former India A and India U19 captain is officially a Renegade!#GETONRED
— Melbourne Renegades (@RenegadesBBL) November 4, 2021
बिग बॅश लीगमध्ये संधी मिळाल्यानंतर उन्मुक्त चंदने आनंद व्यक्त केला आहे. मेलबर्न संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याचं चंदने म्हटलं आहे. आपण नेहमीच बिग बॅश लीग पहात आलोय आणि आता त्याच लीगमध्ये खेळायला मिळत असल्याने ही आपल्यासाठी मोठी संधी असल्याचं उन्मुक्त चंदने म्हटलं आहे.
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने 2012 मध्ये अंडर 19 विश्वचषक जिंकला होता. अंतिम फेरीत उन्मुक्तने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला शानदार विजय मिळवून दिला होता. या विजयानंतर चाहत्यांनी उन्मुक्तला विराट कोहलीची उपमा दिली. पण चाहत्यांच्या अपेक्षा उन्मुक्त पूर्ण करु शकला नाही. आयपीएलमध्ये उन्मुक्त दिल्ली, मुंबई आणि राज्स्थान संघातून खेळला आहे.