मुंबई : भारतामध्ये 'क्रिकेट' हा धर्म आणि सचिन तेंडुलकर हा देव समजला जातो.
सध्या सचिन क्रिकेटपासून दूर असला तरीही भारतीय क्रिकेटर्ससाठी तो मेन्टॉर म्हणून काम करत असतो. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यामध्ये पुन्हा वाढलेला जिव्हाळा मुंबई टी20 लीगमध्ये दिसला.
मुंबई टी 20 लीगच्या फायनलमध्ये शिवाजी पार्क लायन्स टीम हरली. या टीमचा मेन्टॉर म्हणून विनोद कांबळी काम करत होता. सुनील गावस्करांनी सचिनला विनोदच्या गळ्यात मेडल घालायला सांगितले. सचिनने जसं त्याच्या गळ्यात मेडल घातलं तेव्हा विनोदने वाकून सचिनला नमस्कार केला.
@SPLionsMum @T20Mumbai .What a wonderful journey it has been with Shivaji Park Lions.Highs and lows.Enjoyed being a Mentor of the Team.Well played Guys. Thank you fans for the love and support.See you next season. Gheyun Taak pic.twitter.com/P99wHzfajA
— VINOD KAMBLI (@vinodkambli349) March 22, 2018
शालेय जीवनापासून सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र होते. शिवाजी पार्कवर रमाकांत आचरेकरांच्या तालमीखाली दोघेही प्रशिक्षण घेत होते. कालांतराने दोघांनाही आंतरराष्ट्रीय खेळामध्ये संधी मिळाली.
सचिन नवनवे विक्रम रचत होता. दरम्यान विनोद कांबळीला अपेक्षित फॉर्म मिळत नसल्याने तो क्रिकेटपासून दूर गेला. हळूहळू सचिन आणि विनोदमध्ये दरी वाढत होती.
'सच का सामना' या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर 'माझ्या वाईट काळामध्ये सचिन मला अपेक्षेपेक्षा अधिक मदत करू शकला असता. कदाचित मी चुकीच्या मार्गावर जाण्यापासून बचावलो असतो. करिअरमधल्या वाईट काळात मला योग्य प्रेरणादायी व्यक्ती मिळाली असती तर कदाचित माझं क्रिक्रेट करिअर अजून अधिक वेळ चाललं असतं. ' असं विनोद म्हणाला.
रिअॅलिटी शोप्रमाणेच एका इंटरव्ह्यूमध्येही सचिनबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणं विनोदने टाळलं होते. त्यानंतर सचिनने निवृत्तीच्या भाषणावेळेस विनोदचा उल्लेख टाळला. तसेच सचिनवर आधारित डॉक्युमेट्रीमध्ये विनोदचा उल्लेख टाळला आहे.
राजदीप सरदेसाईच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दोघांनी हजेरी लावली होती. ' आम्हां दोघांमधील वाद आता संपले आहेत. आमच्यातील मैत्रीचं पर्व सुरू झाले आहे. ' अशी कबुली विनोदने दिली आहे. अन् सचिन तेंंडुलकर - विनोद कांबळीतील ८ वर्षांचा दुरावा मिटला