विराटच्या शतकानंतर अनुष्का शर्माची पतीसाठी खास पोस्ट; मी सदैव....!

यावर आता अनुष्का शर्माची प्रतिक्रियाही आली आहे.

Updated: Sep 9, 2022, 09:29 AM IST
विराटच्या शतकानंतर अनुष्का शर्माची पतीसाठी खास पोस्ट; मी सदैव....! title=

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात शतकांचा दुष्काळ संपवेल असा अंदाज फार कमी जणांनी वर्तवला असेल. आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये त्याने गुरुवारी दुबईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 1020 दिवसांची प्रतीक्षा संपवली जेव्हा त्याने केवळ 61 बॉल्समध्ये नाबाद 122 रन्स ठोकले. दरम्यान याचं श्रेय त्याने पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकालाही दिलं. यावर आता अनुष्का शर्माची प्रतिक्रियाही आली आहे.

विराटच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना ती म्हणाली, मी सदैव आणि प्रत्येक गोष्टीत नेहमीच तुझ्यासोबत असेन. त्यासोबत तिने हार्ट इमोजीही जोडलं आहे. 

कोहलीने त्याचे 71 वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची बरोबरी केली आहे. कोहलीने जवळपास तीन वर्षांच्या खराब फॉर्मनंतर त्याचं पहिलं शतक झळकावलं. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत, कोहलीच्या पुढे फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर 100 शतकं आहेत. त्याचे चाहते त्याच्या या शतकाची 1020 दिवसांपासून वाट पाहत होते.

शतक झळकावल्यानंतर कोहली म्हणाला की, "गेल्या अडीच वर्षांनी मला खूप काही शिकवलं आहे. मी आता एका महिन्यात 34 वर्षांचा होणार आहे. त्यामुळे हे शतक माझ्यासाठी स्पेशल आहे. दरम्यान या काळात मला संघाने चांगली मदत केली. मी सहा आठवड्यांची सुट्टी घेतली होती. या सुट्टीमध्ये मी किती थकलो आहे, हे मला जाणवलं. या एका ब्रेकमुळे मला पुन्हा एकदा खेळाचा आनंद लुटता आला."

शतकांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे तो भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावलीयेत. आता हा कोहली मोडणार की नाही, याकडे उत्सुकता चाहत्यांना असेल. पण सचिनला ट्वेन्टी-20 किकेटमध्ये शतक झळकावता आलं नव्हतं.