मुंबई : दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश केल्यानंतर आता भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. पुढच्या महिन्यात भारतीय टीम बांगलादेशविरुद्ध टी-२० आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. टी-२० सीरिजसाठी उद्या म्हणजेच २४ तारखेला टीमची निवड होणार आहे. या टी-२० सीरिजसाठी कर्णधार विराट कोहलीला आराम मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. ३ नोव्हेंबरला भारत पहिली टी-२० मॅच खेळणार आहे.
लागोपाठ क्रिकेट खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंना ठराविक कालावधीनंतर आराम दिला जातो. पण विराट कोहली जानेवारी महिन्यापासून क्रिकेट खेळत आहे. पहिले ऑस्ट्रेलिया दौरा, मग न्यूझीलंड दौरा, आयपीएल, वर्ल्ड कप, वेस्ट इंडिज दौरा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज, असं विराट लागोपाठ वर्षभर क्रिकेट खेळला आहे.
विराटला टी-२० सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली असली, तरी टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र तो खेळणार असल्याचं बीसीसीआयच्या सूत्राने स्पष्ट केलं आहे. टी-२० सीरिजसाठी धोनीची निवड होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली धोनीच्या भविष्याबाबत कोहली आणि निवड समितीशी चर्चा करणार आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी एकही मॅच खेळलेला नाही.