विराटनं सचिन-द्रविडला टाकलं मागे

दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

Updated: Jan 18, 2018, 10:06 PM IST
विराटनं सचिन-द्रविडला टाकलं मागे title=

दुबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवानंतर भारताचा कॅप्टन विराट कोहलीवर टीकेची झोड उठत आहे. असं असताना विराट कोहलीसाठी आयसीसी रॅकिंग आनंदाची बातमी घेऊन आलंय.

आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये विराट कोहली ९०० अंकांवर पोहोचला आहे. सुनिल गावसकर यांच्यानंतर हे रेकॉर्ड करणारा विराट दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे.

१९७९ साली आपली ५०वी टेस्ट खेळताना द ओव्हल मैदानात गावसकर यांनी १२ आणि २२१ रन्सची खेळी केली होती. या खेळीमुळे गावसकर ८८७ रेटिंग अंकांवरून ९१६ अंकांवर पोहोचले होते. गावसकर यांची कारकिर्दीतली ही सर्वोत्तम कामगिरी होती.

सेंच्युरिअन टेस्टमध्ये २१वं शतक लगावल्यानंतर कोहली ८८० वरून ९०० वर पोहोचला आहे. हे रेकॉर्ड करायला कोहलीला ६५ टेस्ट लागल्या आहेत.

सचिन-द्रविडलाही जमलं नाही

९०० अंकांच्या जवळ सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडही पोहोचले होते. पण त्यांना हे रेकॉर्ड बनवता आलं नाही. तेंडुलकरचे २००२मध्ये ८९८ आणि राहुल द्रविडचे २००५मध्ये ८९२ अंक होते.

९०० रेटिंग अंक मिळवणारा विराट कोहली टेस्ट इतिहासातला ३१वा बॅट्समन आहे. या यादीमध्ये सर डॉन ब्रॅडमन ९६१ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहेत. यानंतर स्टीव्ह स्मिथ(९४७), लेन हटन(९४५), रिकी पॉटिंग आणि जॅक हॉब्स (९४२) या खेळाडूंचा क्रमांक लागतो.

कोहलीच्या क्रमवारीमध्येही सुधारणा

याचबरोबच विराट कोहलीच्या क्रमवारीमध्येही सुधारणा झाली आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटला मागे टाकून विराट आयसीसी टेस्ट क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आहे. जो रुट तिसऱ्या आणि न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसन चौथ्या क्रमांकावर आहे.

पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये अयशस्वी ठरलेल्या चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे. सहाव्या स्थानावरून पुजारा सातव्या स्थानावर गेला आहे. के.एल. राहुलच्या क्रमवारीमध्ये सहा स्थानांची घसरण होऊन तो १८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.