मुंबई : आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2021 नंतर विराट कोहली क्रिकेटच्या टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. याविषयी काही दिवसांपूर्वी कोहलीने खुलासा केला होता. मात्र, कोहली सध्या या विषयावर काहीही बोलण्यास तयार नाहीये.
विराट कोहलीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याआधी पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर कोणत्याही वादात पडण्यास नकार दिला.
विराट कोहलीने सप्टेंबरमध्येच आपला निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर त्याच्या या निर्णयासंदर्भात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र शनिवारी पत्रकारांच्या सूचनेवरून त्यांने या मुद्द्यावर वादाची अपेक्षा करणाऱ्यांना कोणताही 'मसाला' देणार नसल्याचं सांगितलं.
विराट कोहली म्हणाला की, मी मुद्यावर आधी बरंच बोललो आहे. आता मी या प्रकरणावर गोंधळ घालण्याच्या मूडमध्ये नाही. कर्णधारपदाच्या प्रश्नावर काहीसा चिडून कोहली म्हणाला की, सध्या आमचा भर वर्ल्डकप चांगली कामगिरी करण्यावर आहे.