पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. ७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट मॅच जिंकली आहे. या विजयामुळे भारतीय टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. एवढच नाही तर आता ऑस्ट्रेलियामध्ये भारत पहिल्यांदाच सीरिज जिंकून इतिहास घडवू शकतो, अशा अपेक्षाही होऊ लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला भारतानं व्हाईटवॉश केलं तर विराट कोहली हा भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार होईल.
आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकवर असलेल्या भारतानं विराटच्या नेतृत्वात ४३ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यातल्या २५ टेस्ट मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे तर ९ मॅच भारत हारला आणि ९ मॅच ड्रॉ झाल्या आहेत. धोनी हा भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं ६० पैकी २७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. कोहलीला धोनीची बरोबरी करण्यासाठी फक्त २ विजयांची आवश्यकता आहे.
परदेशामध्ये सर्वाधिक टेस्ट मॅच जिंकण्याचं रेकॉर्ड सध्या सौरव गांगुलीच्या नावावर आहे. सौरव गांगुलीनं परदेशात ११ टेस्ट मॅच जिंकल्या होत्या. तर विराट कोहलीनं आत्तापर्यंत परदेशात १० टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. या यादीमध्ये विराट सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विराटच्या नेतृत्वात भारतानं श्रीलंकेमध्ये सर्वाधिक ५ टेस्ट आणि वेस्ट इंडिजमध्ये २ टेस्ट जिंकल्या आहेत. याचबरोबर भारताला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात प्रत्येकी १-१ विजय मिळाला. ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट जिंकणारा विराट पाचवा भारतीय कर्णधार बनला आहे. बिशनसिंग बेदींच्या नेतृत्वात भारतानं सर्वाधिक २ टेस्ट मॅच, सुनील गावसकर, गांगुली आणि अनिल कुंबळेच्या नेतृत्वात प्रत्येकी १-१ मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. या सीरिजमध्ये विजय मिळवून हे रेकॉर्डही स्वत:च्या नावावर करायची संधी विराटला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीला भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार बनता आलं नाही, तर ही संधी त्लाया २०१९मध्ये मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर २०१९ मध्ये भारत एकूण ८ टेस्ट मॅच खेळणार आहे. यानुसार भारताला झिम्बाब्वेमध्ये मार्चमध्ये एक टेस्ट आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपनंतर जुलै महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये २ टेस्ट खेळायच्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधली भारताची ही पहिली टेस्ट असेल. २०१९ मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका ३ टेस्टसाठी आणि बांगलादेश २ टेस्टसाठी भारताच्या दौऱ्यावर येतील.
दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ हा जगातला सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. स्मिथच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेनं १०९ टेस्टपैकी ५३ टेस्टमध्ये विजय मिळवला. स्मिथनंतर ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉटिंग(४८ विजय), स्टीव्ह वॉ (४१ विजय), वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड (३६ विजय), ऑस्ट्रेलियाचे ऍलन बॉर्डर (३२ विजय), न्यूझीलंडचा स्टिफन फ्लेमिंग (२८ विजय), वेस्ट इंडिजचे व्हिव्हियन रिचर्ड्स आणि भारताचा एमएस धोनी (२७ विजय), ऑस्ट्रेलियाचे मार्क टेलर, इंग्लंडचा मायकल वॉन आणि पाकिस्तानचा मिसबाह उल हक(२६ विजय) हे कर्णधार अजूनही विराटच्या पुढे आहेत.