विराट विक्रम! गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल ३१८ रननी दणदणीत विजय झाला.

Updated: Aug 26, 2019, 05:30 PM IST
विराट विक्रम! गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं title=

एंटिगा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल ३१८ रननी दणदणीत विजय झाला. याचबरोबर २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताने १-०ने आघाडी केली आहे. या विजयासोबतच भारताचा कर्णधार विराट कोहलीने विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने परदेशात सर्वाधिक विजय मिळवले आहेत. विराटने सौरव गांगुलीचा हा विक्रम मोडला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने परदेशात २६ पैकी १२ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. तर सौरव गांगुलीच्या नेतृत्वात परदेशात भारताने २८ मॅचपैकी ११ मॅचमध्ये विजय मिळवला होता.

धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार व्हायला आता विराट कोहलीला फक्त एका विजयाची गरज आहे. विराटने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. धोनी आणि कोहलीच्या नेतृत्वात भारताने प्रत्येकी २७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. धोनीने नेतृत्व केलेल्या ६० टेस्ट मॅचपैकी भारताने २७ मॅच जिंकल्या. याच २७ मॅच जिंकण्यासाठी विराटला फक्त ४७ मॅचमध्ये नेतृत्व करावं लागलं. विराटच्या नेतृत्वात भारताने २७ मॅच जिंकल्या, तर १० मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आणि १० मॅच ड्रॉ झाल्या.

धोनीच्या नेतृत्वात खेळलेल्या ६० मॅचपैकी भारताला २७ मॅचमध्ये विजय, १८ मॅचमध्ये पराभव आणि १५ मॅच ड्रॉ झाल्या. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने ४९ पैकी २१ मॅच जिंकल्या, तर १३ मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आणि १५ मॅच ड्रॉ झाल्या.

२०१४ साली विराट कोहलीला भारताच्या टेस्ट टीमचं कर्णधार बनवण्यात आलं होतं. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात हरवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत भारताला पराभव पत्करावा लागला होता.