विराट मोडणार गांगुली-मियादादचं रेकॉर्ड

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरेल, तेव्हा त्याच्या निशाण्यावर अनेक रेकॉर्ड असतील.

Updated: Aug 8, 2019, 07:23 PM IST
विराट मोडणार गांगुली-मियादादचं रेकॉर्ड title=

गयाना : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरेल, तेव्हा त्याच्या निशाण्यावर अनेक रेकॉर्ड असतील. विराटने त्याच्या वनडे कारकिर्दीत २३६ मॅचमध्ये ४१ शतकं केली आहेत. वनडेमध्ये विराटने जवळपास ६० रनच्या सरासरीने ११,२८६ रन केले आहेत. याच गतीने कोहलीने रन केल्या तर तो पहिल्या किंवा दुसऱ्या वनडेमध्येच सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडेल. शतकांच्याबाबतीत विराट फक्त सचिनच्या (४९ शतकं) मागे आहे.

टी-२० सीरिजमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा ३-०ने पराभव केला. शेवटच्या मॅचमध्ये विराटने ५९ रनची शानदार खेळी केली. यानंतर आता वनडे सीरिजमध्ये विराट गांगुली आणि मियादाद यांची रेकॉर्ड मोडू शकतो.

सौरव गांगुलीने त्याच्या वनडे कारकिर्दीत ११,३६३ रन केले आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गांगुली आठव्या क्रमांकावर आहे. तर विराट नवव्या क्रमांकावर आहे. गांगुलीचं रेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला ७७ रनची गरज आहे. वनडेमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये १८,४२६ रन केले.

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक रन करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या जावेद मियादादच्या नावावर आहे. मियादाने वेस्ट इंडिजविरुद्ध ६४ मॅचमध्ये १,९३० रन केले. विराटने मियादादच्या तुलनेत अर्ध्या मॅच खेळल्या, पण विराट मियादादचा विक्रम मोडण्याच्या जवळ आहे. विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध ३३ मॅचमध्ये १,९१२ रन केल्या आहेत. १९ रन केल्यानंतर विराट वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनेल. ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ १,७०८ रनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.