विराट 'मॅन ऑफ द मॅच', पण हा खेळाडू ठरला विजयाचा हिरो

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जबरदस्त विजय मिळवला.

Updated: Aug 22, 2018, 08:13 PM IST
विराट 'मॅन ऑफ द मॅच', पण हा खेळाडू ठरला विजयाचा हिरो title=

नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जबरदस्त विजय मिळवला. भारतानं ठेवलेल्या ५२१ रनचा पाठलाग करताना इंग्लंडची टीम ३१७ रनवर ऑल आऊट झाली. यामुळे भारताचा २०३ रननी विजय झाला. पहिल्या इनिंगमध्ये ९७ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १०३ रनची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. कोहलीला हा पुरस्कार मिळाला असला तरी भारताच्या या विजयाचा हिरो ठरला हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्यानं या मॅचमध्ये ऑल राऊंडरला साजेशी कामगिरी केली.

पहिले बॉलिंग करताना हार्दिक पांड्यानं फक्त ६ ओव्हरमध्येच इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याच्या या वादळी स्पेलमुळे भारताला १६८ रनची आघाडी मिळाली. त्यामुळे हार्दिक पांड्यानं भारताच्या विजयाचा पाया रचला. यानंतर बॅटिंग करताना पांड्यानं ५२ बॉलमध्ये नाबाद ५२ रनची खेळी केली. चौथ्या इनिंगमध्ये बॉलिंग करताना हार्दिक पांड्यानं बेन स्टोक्सची महत्त्वाची विकेट घेतली.

तिसरी टेस्ट सुरु होण्याआधी हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर टीका करण्यात आली होती. तरी कर्णधार विराट कोहलीनं हार्दिकवर विश्वास ठेवत त्याला टीममध्ये संधी दिली. हार्दिक पांड्यानंही विराटचा विश्वास सार्थ ठरवला.

हार्दिकच्या या कामगिरीनंतर त्याची तुलना परत कपील देव यांच्याशी व्हायला लागली. पण मला कपील देव बनायचं नाही,  हार्दिक पांड्याच राहू द्या. मी स्वत:च्या ओळखीमुळेच खुश आहे, असं वक्तव्य पांड्यानं केलं आहे.

मी आत्तापर्यंत ४० वनडे आणि १० टेस्ट मॅच खेळल्या आहेत, आणि मी हार्दिकच आहे कपील नाही. त्या काळामध्ये अनेक दिग्गज होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर माझी तुलना करू नका, असं आवाहन पांड्यानं केलं.

टीका करणाऱ्यांनाही पांड्यानं प्रत्युत्तर दिलं आहे. मी त्यांच्यासाठी खेळत नाही. त्यांना अशा गोष्टी बोलण्याचे पैसे मिळतात. त्याची मला परवा नाही. मी देशासाठी खेळतो. मी बरोबर खेळत आहे आणि माझी टीम माझ्यावर खुश आहे त्यामुळे दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला मी महत्त्व देत नाही, असं पांड्या म्हणाला.

भारताची सांघिक कामगिरी

भारतानं मिळवलेला हा विजय सांघिक म्हणावा लागेल. कारण विराट कोहली आणि हार्दिक पांड्याबरोबरच इतर खेळाडूंनीही छोटं पण महत्त्वाचं योगदान दिलं आहे.

अजिंक्य रहाणे

पहिल्या इनिंगमध्ये विराटबरोबर अजिंक्य रहाणेनं पार्टनरशीप करून भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. अजिंक्य रहाणेनं ८१ रनची खेळी केली.

ऋषभ पंत

आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या ऋषभ पंतनं विश्वासदर्शक कामगिरी केली. पहिले बॅटिंग करताना पंतनं २४ रनची आश्वासक खेळी केली. तर विकेट कीपिंग करताना पंतनं ५ कॅच पकडले.

लोकेश राहुल 

लोकेश राहुलनं या मॅचमध्ये २३ आणि ३६ रन केले असले तरी त्यानं मॅचमध्ये तब्बल ७ कॅच पकडले आहेत. एका टेस्ट मॅचमध्ये एवढे कॅच पकडणारा लोकेश राहुल दुसरा खेळाडू (विकेट कीपर वगळता) बनला आहे.

जसप्रीत बुमराह

दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. जॉस बटलर आणि बेन स्टोक्स यांची १६९ रनची पार्टनरशीप जसप्रीत बुमराहनंच तोडली.

चेतेश्वर पुजारा

पहिल्या तिन्ही मॅचमध्ये, काऊंटी क्रिकेटमध्ये आणि मागच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये संघर्ष करणाऱ्या चेतेश्वर पुजारानं दुसऱ्या इनिंगमध्ये ७२ रन केले. पुजारा आणि कोहलीनं तिसऱ्या विकेटसाठी ११३ रनची पार्टनरशीप केली आणि या टेस्ट मॅचवर भारताची पकड आणखी मजबूत केली.