मुंबई : अल जजिरानं क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे. अल जजिरानं केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचं सांगण्यात आलंय. भारताविरुद्ध रांचीमध्ये मार्च २०१७ साली झालेल्या टेस्टमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा या स्टिंग ऑपरेशनमध्ये करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी ठराविक कालावधीमध्ये धीम्या गतीनं बॅटिंग करून स्पॉट फिक्सिंग केली, असं या स्टिंग ऑपरेशनमध्ये दाखवण्यात आलं आहे.
अल जजिराच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये भारतात राहणारा अनिल मुनव्वर दोन खेळाडूंचं नाव घेत आहे. या दोन्ही खेळाडूंची नावं डॉक्युमेंट्रीमधून कापण्यात आली आहेत. या दोन्ही खेळाडूंनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे, असं अल जजिरानं सांगितलं. मुनव्वरनं या मॅचमध्ये ज्या गतीनं रन होतील ते सांगतिलं तशाच रन झाल्याचं अल जजिराचं म्हणणं आहे.
आयसीसी किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले असल्याचा कोणताही पुरावा नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही डॉक्युमेंट्री बघितली नाही. जे आरोप लागले त्याचं फूटेजही आम्हाला मिळालेलं नाही, अशी प्रतिक्रिया क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं अल जजिराकडे स्टिंग ऑपरेशनचं फूटेज मागितलं आहे. आरोप खरे आहेत का खोटे हे पाहण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं हे सगळं फूटेज काट-छाट न करता पाठवण्याची विनंतीही अल जजिराकडे केली आहे. तसंच आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला आम्ही संपूर्ण पाठिंबा देऊ, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड म्हणाले आहेत.
अल जजीरा या चॅनलनं हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारत-श्रीलंकेमध्ये २६-२९ जुलै २०१७ साली गेल मैदानात झालेली टेस्ट, भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रांचीत १६-२० मार्च २०१७ साली झालेली टेस्ट आणि भारत-इंग्लंडमध्ये चेन्नईत १६-२० डिसेंबर २०१६ साली झालेल्या टेस्टचा समावेश आहे. गेल आणि चेन्नईत झालेल्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता तर रांचीमध्ये झालेली मॅच ड्रॉ झाली होती.
अल जजीरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रॉबिन मॉरिस पत्रकाराला गेल मैदानाचा पिच क्युरेटर थरंगा इंडिकाची भेट घालून देतो. या भेटीमध्ये क्युरेटर थरंगा इंडिका पिचमध्ये बदल करण्याचा दावाही करतो. रॉबिन मॉरिसला या व्हिडिओमध्ये कथित स्वरुपात पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन रजाबरोबर दाखवण्यात आलं आहे. हसन रजा हा सगळ्यात लहान वयात टेस्ट क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याचा संपर्क आणि मैदानातल्या कर्मचाऱ्यांबरोबर पिच फिक्स करण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल सांगत आहे.
मुंबईच्या शारदाश्रम शाळेतून शिकलेला रॉबिन मॉरिस हा रमाकांत आचरेकर यांचा शिष्य होता. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मॉरिसनं ३१ व्या वर्षी क्रिकेट खेळणं सोडून दिलं. मॉरिस चांगलं क्रिकेट खेळत असताना आयपीएल असतं तर अनेक टीमनी त्याच्यावर चांगल्या पैशांची बोली लावली असती, असं मुंबई क्रिकेटशी जोडलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं आहे. मध्यमवर्गीय असलेला रॉबिन मॉरिसनं भारत पेट्रोलियमची सुरक्षित नोकरी सोडली. देशांतर्गत क्रिकेट खेळून मॉरिसला एवढे पैसे मिळाले नाहीत तरीही तो मर्सिडिज बेंझ ही गाडी चालवायचा आणि महाग घड्याळं घालायचा, असं मॉरिसच्या एका जवळच्या मित्रानं सांगितलं आहे.
मॉरिस त्याच्या जुन्या मित्रांपासून लांब गेला होता. त्याच्या लागोपाठच्या दुबई यात्रांवर संशयही घेतला जात होता, असं मॉरिससोबत दुलीप आणि देवधर ट्रॉफी खेळणारा माजी क्रिकेटपटू म्हणाला आहे. या वादानंतर मॉरिसनं त्याचा मोबाईल बंद केला आहे. एवढच नाही तर त्यानं त्याचं फेसबूक अकाऊंटही बंद केलं आहे.