Pakistan Cricket News : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी खेळाडूंना पगार मिळाला नाही, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये (PCB) चाललंय काय? असा सवाल विचारला जात होता. अशातच सोमवारी, माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने (Inzamam-Ul-Haq) विश्वचषक स्पर्धेच्या मध्यभागी मुख्य निवडकर्ता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, वर्ल्ड कपमधील पराभवामुळे इंझमामने राजीनामा दिल्याची चर्चा केवळ पोकळ असल्याचं दिसतंय. खरं कारण काय? इंझमाम उल हकने तडकाफडकी राजीनामा (Inzamam Ul Haq Resigns) का दिला? याचं कारण आता समोर आलं आहे.
हारून रशीद यांनी पद सोडल्यानंतर 53 वर्षीय इंझमाम-उल-हकची पाकिस्तान क्रिकेटमध्ये चीफ सिलेक्टर म्हणून निवड केली गेली. मात्र, निवड समितीत आल्यावर इंझमामने आपले हितसंबंध जपल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान संघाचं सिलेक्शन करताना इंझमाम-उल-हक याचा भाचा इमाम-उल-हक याचं नाव जाहीर करण्यात आलं. त्याचबरोबर काही खेळाडूंच्या एन्ट्रीने अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर सिलेक्शन कमिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. प्रकरण एवढ्यावर थांबत नाही तर इंझमामने आर्थिक हितसंबंध जपल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
इंझमामची याजो इंटरनॅशन या कंपनीमध्ये हिस्सेदारी आहे. ही कंपनी खेळाडूंच्या मॅनेजमेंटचे काम पाहते. ही इंटरनॅशनल कंपनी बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी या खेळाडूंचं काम पाहते. या कंपनीचे मालक तल्हा रेहमानी आणि इंझमाम यांचे चांगले संबंध असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तानी खेळाडूंचा इंझमामची हिस्सेदारी असलेल्या कंपनीशी करार झाल्याने इंझमामने संधी साधून हितसंबंध जपल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं चाललंय काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Inzamam Ul Haq reveals the reason behind his resignation.pic.twitter.com/fuKSjwj9AB
— CricTracker (@Cricketracker) October 30, 2023
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) संघ निवड प्रक्रियेशी संबंधित मीडियामध्ये हितसंबंधांच्या संघर्षाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय तथ्य शोध समितीची स्थापना केली आहे. समिती आपला अहवाल आणि कोणत्याही शिफारशी पीसीबी व्यवस्थापनाला जलदगतीने सादर करेल, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे.