Dhoni On Retirement Form IPL: CSK फायन्समध्ये! निवृत्तीबद्दल विचारलं असता धोनी म्हणाला, "आताच डोक्याला ताप.."

Dhoni On Retirement Form IPL: धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने 10 व्यांदा इंडियन प्रमिअर लिगचा अंतिम सामना गाठण्याचा पराक्रम केल्यानंतर त्याला हर्षा भोगलेंनी निवृत्तीबद्दल विचारलं. या प्रश्नाला धोनीने अगदी सविस्तर उत्तर दिलं.

Dhoni On Retirement Form IPL: CSK फायन्समध्ये! निवृत्तीबद्दल विचारलं असता धोनी म्हणाला, "आताच डोक्याला ताप.."
Dhoni On Retirement Form IPL

Dhoni Talks About His Retirement Form IPL: चेन्नई सुपर किंग्जसच्या (Chennai Super Kings) संघाने मंगळवारी (23 मे 2023) झालेल्या सामन्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी करत 10 व्यांदा इंडियन प्रमिअर लिगच्या (IPL 2023) अंतिम सामन्यात धडक मारली. कोणत्याही संघाने यापूर्वी अशी कामगिरी केलेली नाही. सध्याच्या पर्वामध्ये साखळी फेरीत 14 पैकी 10 सामने जिंकून पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल राहिलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने 15 धावांनी पराभूत (CSK Beat GT) केलं. चेन्नईने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच गुजरातला पराभूत करण्याचा पराक्रम केला तो थेट अंतिम सामना गाठतानाच!

मागील वर्षी 9 वं स्थान यंदा थेट फायनल

मागील वर्षी झालेल्या पर्वामध्ये चेन्नईचा संघ 9 व्या स्थानावर होता. यंदाच्या पर्वात अनुभवी गोलंदाजांची उणीव असतानाही धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारल्याने संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. साखळी फेरीतील 7 सामने चेन्नईने घरच्या मैदानावरच खेळले. कालचा चेपॉकच्या मैदानातील सामना हा धोनीच्या संघाचा यंदाच्या पर्वातील घरच्या मैदानावरील शेवटचा सामना होता. त्यामुळेच पुन्हा चेन्नईच्या प्रेक्षकांना धोनी प्रत्यक्षात मैदानात उतरुन खेळताना पहायला मिळणार का असा प्रश्न सामन्यानंतर समालोचकांनी थेट कॅप्टन कूल धोनीलाच विचारला. अगदी सावधपणे धोनीच्या निवृत्तीसंदर्भात समालोचकांनी विचारलेल्या प्रश्नाला धोनीने दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे.

धोेनीच्या निवृत्तीची चर्चा

यंदाच्या आयपीएलच्या पर्वानंतर म्हणजेच 2023 नंतर धोनी आयपीएलमधूनही निवृत्त होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील 2 पर्वांपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा आहे. मात्र 10 व्यांदा संघाला अंतिम सामन्यात घेऊन जाणाऱ्या या भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराने आपल्या निवृत्तीसंदर्भात थेट भाष्य केलं आहे. सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये हर्षा भोगले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धोनीने निवृत्तीसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आपल्या हातात काही वेळ आहे असं सांगितलं. 

नक्की वाचा >> IPL 2023 Eliminator: मुंबईच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी! जेव्हा जेव्हा MI vs LSG सामना झाला तेव्हा...

धोनी उत्तर देताना म्हणाला, "आताच डोक्याला ताप.."

हर्षा यांनी विचारलेल्या निवृत्तीसंदर्भातील प्रश्नावर धोनीने, "मला ठाऊक नाही. माझ्याकडे 8 ते 9 महिने आहेत यावर निर्णय घेण्यासाठी. डिसेंबरच्या आसपास आयपीएलच्या लिलावाची पहिली छोटी फेरी पार पडणार आहे. त्यामुळे आताच डोक्याला ताप कशाला लावून घ्यायचा? यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ आहे. मी खेळत असो किंवा मैदानाबाहेर असो मी कायमच सीएसकेच्या संघासाठी उपलब्ध असेल. मात्र मला नेमकं ठाऊक नाही," असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना धोनी, "खरं सांगायचं झाल्यास याचा फार परिणाम होतो. मी मागील 4 महिन्यांपासून घराबाहेर आहे. 31 जानेवारी रोजी मी घरातून बाहेर पडलो. माझी सगळी कामं संपवून मी 2 ते 3 मार्चपासून सरावाला सुरुवात केली. त्यामुळे यासाठी बराच वेळ खर्च केला आहे. मात्र पुढील निर्णय गेण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ आहे," असंही म्हटलं.

चेन्नई सर्वाधिक वेळा फायनल्समध्ये

चेन्नईच्या संघाने गुजरातला पराभूत करुन अंतिम सामन्यात धडक मारली आहे. 2 वर्षांच्या बंदीचा कालावधी वगळल्यास 16 पैकी 14 पर्वांमध्ये चेन्नईचा संघ खेळला आहे. या 14 पैकी 10 वेळा चेन्नईची टीम अंतिम सामना खेळणारी एकमेव टीम आहे. चेन्नईने आतापर्यंत 4 वेळा आयपीएलचा चषक जिंकला आहे. चेन्नई खालोखाल मुंबई इंडियन्सच्या संघाने सर्वाधिक म्हणजेच 6 वेळा अंतिम फेरी गाठली असून त्यापैकी 5 वेळा मुंबईने चषकावर नावर कोरलं आहे.