मुंबई : कोरोनामुळे जगातली सगळ्यात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकवर संकंट ओढावलं आहे. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये टोकियोमध्ये ही स्पर्धा होते का, याची शंका उपस्थित झाली आहे. पण आपल्या देशात यापेक्षा जास्त चिंता आहे ती आयपीएलचं काय याची.
आयपीएल हा क्रिकेट जगतातला वर्ल्ड कप खालोखालचा सर्वात मोठा इव्हेंट. जगात कोरोना व्हायरसचा फैलाव होत असताना आयपीएलचं काय होणार, याची भीती क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. पण घाबरायचं कारण नाही. आजमितीस तरी आयपीएल ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे.
एकतर भारतामध्ये अद्याप कोरोनाचा फारसा फैलाव नाही. आतापर्यंत आढळलेल्या ३० रुग्णांपैकी १६ जण हे इटलीचे पर्यटक आहेत. केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना केल्यात. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
दुसरं कारण म्हणजे आयपीएलमध्ये बहुतांश खेळाडू हे भारतीयच आहेत. त्यात परदेशी खेळाडूंची संख्या कमी आहे. अन्य खंडांमधून येणारे खेळाडू प्रामुख्यानं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि कॅरेबियन देशांमधूनच येतात. यापैकी कोणत्याच देशात आतापर्यंत कोरोनाचा तितकासा प्रभाव नाही. तिसरं कारण म्हणजे ऑलिम्पिक किंवा टेनिस ग्रँडस्लॅमप्रमाणे आयपीएल पुढे ढकलली जाऊ शकत नाही.
आयसीसीनं आयपीएलसाठी विंडो ठेवलेली असते. त्यामुळे आता टुर्नामेंट झाली नाही, तर ती थेट रद्दच करावी लागेल. हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या वाहिनीनं त्यासाठी १६ हजार ३४७ कोटींची गुंतवणूक केली आहे. या रक्कमेचा विमा उतरवला असला तरी यातील केवळ ८० टक्केच रक्कम वसूल होऊ शकेल. शिवाय त्या वाहिनीला जाहिरातीमधून मिळणारा महसूल बुडेल आणि पर्यायानं आयपीएलचं तसंच फ्रेंचायजीजचं मोठं आर्थिक नुकसान होईल.
त्यामुळे सध्यातरी आयपीएलला कोरोनाचा धोका नाही. आता जागतिक आरोग्य संघटना, आयसीसी किंवा केंद्र सरकारनं नकार दिला, तरच आयपीएल रद्द होऊ शकते अशी स्थिती आहे. अर्थात कोरोनाच्या भीतीमुळे प्रेक्षक स्टेडियमवर मॅच पाहायला येतील का? ही धाकधूक आयोजकांच्या मनात आहेच. २९ मार्चला वानखेडे स्टेडियमवर मुंबई-चेन्नईत पहिली मॅच होईल, तेव्हाच खरं चित्र स्पष्ट होईल.