Kane Williamson Declined Central Contract: यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या टीमला काही खास कामगिरी करता आली नाही. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला सुपर 8 मध्ये प्रवेश करता आला नाही. दरम्यान वर्ल्डकपमधील निकाल पाहता टीमचा कर्णधार केन विलियम्सनने मोठा निर्णय घेत सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नाकाराला आणि कर्णधारपदही सोडलं. तर आता न्यूझीलंडच्या बोर्डाकडून केनला स्पेशल ट्रीटमेंट मिळताना दिसतेय.
2024 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे केनने हा निर्णय घेतला आहे. असं सर्वांचं मत आहे. मात्र या मागील खरं कारण काही वेगळं असण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत न्यूझीलंडच्या अनेक खेळाडूंनी केंद्रीय करार नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्युसन या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये क्रिकेटपेक्षा रग्बीला अधिक पसंती दिली जाते. भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या तुलनेत या देशात क्रिकेटची लोकप्रियता खूपच कमी आहे. तर न्यूझीलंडची टीम वर्षातून केवळ 2-3 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते. केनने हा निर्णय घेतला आहे याचं कारण म्हणजे तो ऑफ सिझनमध्ये दुसऱ्या देशात जाऊन लीग क्रिकेटमध्ये भाग घेऊ शकेल.
कर्णधारपद आणि सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडल्यानंतर केन विल्यमसन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळणार का, असा प्रश्नही चाहत्यांच्या मनात उपस्थित होतोय. दरम्यान न्यूझीलंड फक्त अशाच खेळाडूंची राष्ट्रीय टीममध्ये निवड करते जे सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत. परंतु विलियम्सन हा अपवाद असेल जो सेंट्रल करार नसतानाही न्यूझीलंडकडून खेळू शकेल. याचा अर्थ न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड या प्रकरणी केनला स्पेशल ट्रिटमेंट देतेय.
न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ स्कॉट वेनिंक यांच्या सांगण्यानुसार, न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड नेहमी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट असलेल्या खेळाडूंना प्रथम प्राधान्य देते. मात्र आम्ही केनला अपवाद मानून त्याला खेळण्याची संधी देऊ. केनने टीमसाठी चांगली कामगिरी केली असून तो टीमसाठी वचनबद्ध आहे.