Corona : दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं आहे. 

Updated: Apr 1, 2020, 11:35 PM IST
Corona : दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द

लंडन : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो जण कोरोना संक्रमित झाले आहेत. जगातले बहुतेक देश कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहेत. कोरोनाच्या या धोक्यामुळे टेनिसमधली सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा समजल्या जाणारी विम्बल्डन रद्द करण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द करावी लागली आहे.

'मेन बोर्ड ऑफ ऑल इंग्लंड क्लब आणि प्रशासकीय समितीने कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल आम्ही दिलगिर आहोत. १३४वी विम्बल्डन स्पर्धा २८ जून ते ११ जुलै २०२१ दरम्यान खेळवली जाईल,' असं संस्थेकडून सांगण्यात आलं.

खेळाडू, जगभरातून येणारे प्रेक्षक, कर्मचारी, सदस्य, स्वयंसेवक, स्थानिक नागरिक, जाहिरातदार यांच्या योगदानामुळे विम्बल्डन स्पर्धेचं आयोजन होऊ शकतं, या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी ही आमची प्राथमिकता आहे, असं संस्थेनं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

विम्बल्डन स्पर्धा बंद स्टेडियममध्ये, प्रेक्षकांशिवाय होणार नाही, तसंच स्पर्धा पुढेही ढकलण्यात येणार नाही, कारण मॅच खेळण्यासाठी आवश्यक असलेलं योग्य पद्धतीचं गवत ठेवता येणार नाही, असं मागच्याच आठवड्यात स्पष्ट करण्यात आलं होतं.

विम्बल्डनआधी टोकयो ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. २०२१ साली २३ जुलैपासून टोकयो ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे तर ८ ऑगस्ट २०२१ ला या ऑलिम्पिकची सांगता होईल. यंदाच्या वर्षी २४ जुलैला टोकयो ऑलिम्पिकला सुरुवात होणार होती.

विम्बल्डन आणि ऑलिम्पिकप्रमाणेच ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवरही संकट ओढावलं आहे. २०२१ साली भारतामध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार असल्यामुळे ऑस्ट्रेलियातला टी-२० वर्ल्ड कप २ वर्षानंतर म्हणजेच २०२२ साली होऊ शकतो. तर दुसरीकडे आयपीएल स्पर्धेचं भविष्यही अंधारात आहे. २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार होती, पण कोरोनाचा धोका वाढल्यामुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. भारतातली सध्याची परिस्थिती बघता आयपीएल १५ एप्रिलपासून सुरू होणं अशक्य आहे, त्यामुळे स्पर्धा रद्द होण्याची शक्यताच जास्त आहे.