मुंबई : अखेर महिलांच्या आयपीएलला मुहूर्त मिळाला आहे. महिलांच्या मिनी २०-२० आयपीएल स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. ६ ते ११ मे या कालवधीत तीन टीममध्ये महिलांची ही स्पर्धा होईल. सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी अशी तीन सहभागी संघांची नाव आहेत.
जयपूरमध्ये हे सामने खेळवले जाणार असून यामध्ये भारत आणि जगातील अव्वल महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. हे तानही संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ अंतिम फेरीत भिडतील.
याआधी मागच्या वर्षी आयपीएलदरम्यान मुंबईमध्ये महिलांची एक मॅच खेळवण्यात आली होती. या मॅचमध्ये ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्मृती मंधाना आणि सुपरनोव्हाजची कर्णधार हरमनप्रीत कौर होती. या मॅचमध्ये सुपरनोव्हाज टीमचा ३ विकेटने विजय झाला होता. यावेळीही या दोघींकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे, तर मिताली राज व्हेलॉसिटीची कर्णधार असेल.
मागच्या वर्षी झालेल्या महिलांच्या टी-२० मॅचमध्ये जगभरातल्या दिग्गज खेळाडू भारतात आल्या होत्या. यामध्ये एलिस पेरी, सोफी डिवाईन, मॅग लेनिंग, सूजी बेट्स आणि एलिसा हेले सहभागी झाल्या होत्या. यावर्षी मात्र कोणती खेळाडू कोणत्या टीमकडून खेळणार याबाबत मात्र बीसीसीआयने अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही. या मॅचच्या प्रक्षेपणाचे हक्क बीसीसीआयने स्टार स्पोर्ट्सला दिले आहेत.