ICC Women's T20 World Cup 2024 : आगामी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या आयोजनाविषयी मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. यंदाच्या वर्ल्ड कपचे आयोजन हे बांगलादेशमध्ये होणार होते. मात्र बांगलादेशमध्ये बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे तेथे वर्ल्ड कप खेळवणे सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य नसून वर्ल्ड कपच्या आयोजनाचे ठिकाण बदलावे अशी मागणी अनेक देशांकडून केली जात होती. अखेर आयसीसीने याबाबत मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या महिला टी 20 वर्ल्ड कपच्या आयोजनाचं ठिकाण बदललं आहे.
आयसीसीने मंगळवारी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 यंदा यूएईमध्ये आयोजित केल्याचं सांगितलं आहे. यंदा महिला टी 20 वर्ल्ड कपचं हे नववं वर्ष असून याच यजमानपद यंदा बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे होतं. मात्र देशातील परिस्थिती लक्षात घेऊन हा वर्ल्ड कप बांगलादेश ऐवजी यूएईमधील दुबई आणि शारजाह स्टेडियमवर खेळवण्यात येतील. स्वतः बांगलादेश क्रिकेट बोर्ड याचं आयोजन करणार आहे.
The ninth edition of ICC Women’s #T20WorldCup to be held in October 2024 has been relocated to a new venue.
Details https://t.co/20vK9EMEdN
— ICC (@ICC) August 20, 2024
3 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान महिला टी 20 वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. यात एकूण 16 संघ सहभागी होणार असून स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जातील. आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ ॲलार्डिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "बांगलादेशमध्ये महिला टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करता आले नाही याची आम्हाला खंत आहे. आम्हाला माहित आहे की बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एक संस्मरणीय कार्यक्रम आयोजित केला असता. मी बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डाचे आभार मानतो की त्यांनी बांगलादेशमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अनेक देशांच्या सरकारांकडून बांगलादेशमध्ये जाऊन स्पर्धा खेळण्यासाठी चिंता व्यक्त केली होती. बांगलादेशची टीम वर्ल्ड कप आयोजनाचे सर्व अधिकार राखून ठेवतील. भविष्यात बांगलादेशमध्ये आयसीसी जागतिक स्पर्धा घेण्यास आम्ही उत्सुक आहोत" .