World Cup 2019: खासदार झाला, आता वर्ल्ड कप खेळणार!

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

Updated: May 27, 2019, 07:11 PM IST
World Cup 2019: खासदार झाला, आता वर्ल्ड कप खेळणार! title=

मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशच्या कर्णधारपदाची धुरा मशरफी मुर्तझाकडे सोपवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतानाच खासदार असणारा मशरफी मुर्तझा हा पहिलाच क्रिकेटपटू आहे. डिसेंबर महिन्यात बांगलादेशमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगनं जोरदार विजय मिळवला.

मुर्तझानं शेख हसीना यांचा पक्ष असलेल्या अवामी लीग पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. या निवडणुकीत तो अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आला. मुर्तझानं नरेल-दोन या जागेवरून निवडणूक लढवली. मुर्तझाला या निवडणुकीत २,७४,४१८ मतं मिळाली. तर मुर्तझाच्या विरुद्ध उभ्या असलेल्या उमेदवाराला फक्त ८,००६ मतं मिळाली. अवामी लीगच्या नेतृत्वातल्या आघाडीला ३०० पैकी २६० ठिकाणी विजय मिळाला. बांगलादेशमधल्या या विजयामुळे शेख हसीन चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या.

मशरफी मुर्तझाचं रेकॉर्ड

एखादा क्रिकेटपटू खासदार बनल्यानंतर वर्ल्ड कप खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मशरफी मुर्तझाने २०९ मॅचमध्ये २६५ विकेट घेतल्या आहेत, तर १४.०२ च्या सरासरीने १७४२ रन केल्या आहेत.

क्रिकेटपटू आणि खासदार

अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान हे तर सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. तर भारतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर भाजपच्या तिकीटावर निवडून आला. सचिन तेंडुलकर हा राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचा खासदार झाला. श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगा यांना निवडणूक जिंकून मंत्रीपदही मिळालं, तर सनथ जयसूर्याही श्रीलंकेमध्ये खासदार झाला.