मँचेस्टर: क्रिकेट विश्वचषकातील बहुप्रतिक्षीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज इंग्लंडच्या मँचेस्टरमधील मैदानावर रंगणार आहे. या लढतीसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ आणि त्यांचे चाहते पूर्णपणे सज्ज आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे. मात्र, या सामन्यादरम्यान मँचेस्टरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परंपरागत हाडवैरामुळे दोन्ही देशांमध्ये होणारे क्रिकेट सामने नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास भारत नेहमीच पाकिस्तानवर वरचढ ठरला आहे. त्यामुळे आज या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे दडपण भारतावर असेल. तर पाकिस्तानचा संघही धोकादायक निकालांसाठी ओळखला जातो. त्यामुळे टीम इंडियाने आपण हा सामना जिंकू, असे गृहीत धरून गाफील राहता कामा नये, असा इशारा भारताचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी दिला आहे.
भारत - पाकिस्तान लढत : दोन्ही संघांकडून खेळलेले खेळाडू, पाहा कोण?
भारताची भक्कम फलंदाजी आणि पाकिस्तानची भेदक गोलंदाजी यामुळे हा सामना नेहमीप्रमाणे रंगेल, अशी आशा क्रीडा रसिकांना आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये ४५ एकदिवसीय सामन्यांत केवळ १८ वेळा प्रथम फलंदाजी घेतली गेली आहे. शेवटच्या पाच सामन्यांमध्ये सरासरी २६० धावा काढण्यात आल्या होत्या. सध्याचे प्रतिकूल हवामान पाहता प्रथम क्षेत्ररक्षण करणे योग्य ठरेल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.