World Cup 2019: पाकिस्तानसाठी 'लकी' फॉरमॅट, भारताला इतिहास बदलावा लागणार

५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Updated: May 22, 2019, 09:32 PM IST
World Cup 2019: पाकिस्तानसाठी 'लकी' फॉरमॅट, भारताला इतिहास बदलावा लागणार title=

लंडन : ५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. ४४ वर्षात दुसऱ्यांदाचा हा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे.

राऊंड रॉबिन फॉरमॅटमुळे या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या १० टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यामुळे प्रत्येक टीम कमीत कमी ९ मॅच खेळेल. यानंतर टॉप-४ टीम या सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. याआधी १९९२ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आलेला वर्ल्ड कप या फॉरमॅटमध्ये होता.

१९९२ साली पाकिस्तानसाठी लकी फॉरमॅट

वर्ल्ड कपमध्ये १९९२ साली पहिल्यांदा वापरण्यात आलेला राऊंड रॉबिन फॉरमॅट पाकिस्तानसाठी लकी ठरला होता. इम्रान खानच्या नेतृत्वात पाकिस्तानने १९९२ चा वर्ल्ड कप जिंकला होता. तर भारताला त्या वर्ल्ड कपमध्ये फक्त २ मॅच जिंकता आल्या होत्या आणि ६ मॅचमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे भारताला इतिहास बदलावा लागणार आहे.

'राऊंड रॉबिन'मध्ये सगळ्यांना संधी

राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळते, यामुळे सगळ्यांना समान संधी मिळते. ग्रुप स्टेजमध्ये मात्र मजबूत टीम एकत्र आल्या तर एखाद्या चांगल्या टीमचं नुकसान होतं. राऊंड रॉबिन फॉरमॅटमुळे स्पर्धेचा कालावधी वाढतो, त्यामुळे खेळाडूंना फिटनेस आणि फॉर्म कायम ठेवण्याचं आव्हान असतं.

११ पैकी ६ वर्ल्ड कप ग्रुप फॉरमॅटमध्ये

क्रिकेट वर्ल्ड कप आत्तापर्यंत तीन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आले. ४ वर्ल्ड कप ग्रुप आणि नॉकआऊट फॉरमॅटमध्ये खेळले गेले. १९९९, २००३ आणि २००७ सालचा वर्ल्ड कप ग्रुप आणि सुपर-६/सुपर-८ आणि नॉकआऊट फॉरमॅटमध्ये झाले. पुढचे दोन वर्ल्ड कप पुन्हा ग्रुप आणि नॉकआऊट फॉरमॅटमध्ये पार पडले. आता पुन्हा एकदा आयसीसी राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप खेळवणार आहे.

१९८३ आणि २०११ वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला. १९८३ वर्ल्ड कपमध्ये भारताने ८ मॅच खेळल्या, यातल्या ६ मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर २ मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला.

२०११ वर्ल्ड कपमध्ये भारताने ९ मॅच खेळल्या, यातल्या ७ मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर एक मॅचमध्ये भारत पराभूत झाला. इंग्लंडविरुद्धची मॅच टाय झाली.

१९९२ सालच्या वर्ल्ड कपमध्ये विजयी झालेल्या पाकिस्तानने १० मॅचपैकी ६ मॅच जिंकल्या होत्या. फायनलमध्ये पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता. सुरुवातीच्या राऊंडमध्ये इंग्लंडने पाकिस्तानला ७४ रनवर ऑलआऊट केलं होतं.

२००७ चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ११ मॅच खेळल्या होत्या. एका वर्ल्ड कपमध्ये एवढ्या मॅच खेळण्याचा हा विक्रम आहे. २००७ वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजनंतर ८ टीम सुपर-८मध्ये गेल्या होत्या. यानंतर सेमीफायन आणि फायनल खेळवण्यात आली.

पहिले दोन वर्ल्ड कप (१९७५, १९७९) जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजने प्रत्येक स्पर्धेत फक्त ५-५ मॅच खेळल्या होत्या. यातल्या १९७५ वर्ल्ड कपच्या पाचही मॅच वेस्ट इंडिजने जिंकल्या, तर १९७९मध्ये त्यांनी ४ मॅच जिंकल्या आणि १ मॅच रद्द झाली.