मुंबई : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रम केले. यामध्ये रोहित शर्माच्या संपूर्ण स्पर्धेतल्या सर्वाधिक रन आणि मोहम्मद शमीच्या हॅट्रिकचा समावेश आहे. या वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहनेही शानदार बॉलिंग केली, पण त्याने केलेल्या विक्रमावर मात्र कोणाचंच लक्ष गेलं नाही.
ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने या वर्ल्ड कपमध्ये १० मॅचमध्ये सर्वाधिक २७ विकेट घेतल्या. तर बुमराहने ९ मॅचमध्ये १८ विकेट घेतल्या. बुमराहने वर्ल्ड कपमध्ये ४.४१ रन प्रती ओव्हरच्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. या स्पर्धेतला हा ९वा सर्वोत्तम इकोनॉमी रेट होता. पण यातल्या बहुतेक बॉलरनी ३० पेक्षा कमी ओव्हर टाकल्या होत्या.
वर्ल्ड कप सुरु व्हायच्या आधी बुमराह वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. वर्ल्ड कप संपल्यानंतरही बुमराह पहिल्य क्रमांकावरच आहे. बुमराहने या स्पर्धेत ९ मॅचमध्ये ८४ ओव्हर टाकल्या. २०.६१ ची सरासरी आणि ४.४१ च्या इकोनॉमी रेटने त्याने १८ विकेट घेतल्या. ५५ रनमध्ये ४ विकेट ही बुमराहची सर्वोत्तम कामगिरी होती. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमध्ये बुमराह ५व्या क्रमांकावर राहिला. पण वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम बुमराहने केला. बुमराहने वर्ल्ड कपमध्ये ९ ओव्हर मेडन टाकल्या. यानंतर जोफ्रा आर्चरने ८ ओव्हर मेडन टाकल्या.
याचसोबत बुमराहने आणखी एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केलं. बुमराहने या वर्ल्ड कपमधली सगळ्यात कमी रन देणारी बॉलिंग टाकली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये बुमराहने १.५ रनच्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. मॅनचेस्टरमध्ये झालेल्या या मॅचमध्ये बुमराहने ६ ओव्हरमध्ये फक्त ९ रन दिल्या, यातली १ ओव्हर मेडन होती. बुमराहने या मॅचमध्ये २ विकेटही घेतल्या होत्या. बुमराहनंतर बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्ध लीग मॅचमध्ये २ रनच्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. स्टोक्सने ५ ओव्हरमध्ये १० रन देऊन १ विकेट घेतली.