मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. रविवारी मॅनचेस्टरमध्ये झालेल्या या सामन्यात भारताचा ८९ रननी विजय झाला. भारताने ठेवलेल्या ३३७ रनचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. ओपनर इमाम-उल-हक हा लवकर आऊट झाला. पण पहिल्या विकेटनंतर फकर जमान आणि बाबर आजम यांनी पाकिस्तानची इनिंग सावरायला सुरुवात केली.
फकर जमान आणि बाबर आजम यांच्यामध्ये शतकी पार्टनरशीप झाली. या दोघांनी मिळून पाकिस्तानचा स्कोअर ११७ पर्यंत पोहोचवला. या दोघांची जोडी भारताला अडचणीत आणेल, असं वाटत होतं. पण २४व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कुलदीप यादवने जादू केली. कुलदीपने टाकलेला बॉल बाबर आजमच्या बॅट आणि पॅडमधून गेला. कुलदीपने टाकलेल्या या बॉलला आयसीसीनेही 'मॅजिकल डिलिव्हरी' म्हणलं आहे. बाबर आजम ४८ रन करुन आऊट झाला.
Watch Kuldeep Yadav's magical delivery to dismiss Babar Azam, and all the other Pakistan wickets #INDvPAK #CWC19 #TeamIndia pic.twitter.com/ybqvLYy9Ul
— ICC (@ICC) June 16, 2019
बाबर आजमची विकेट गेल्यानंतर पाकिस्तानची बॅटिंग गडगडली. बाबर आजमची विकेट घेतल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये कुलदीपने फकर जमानलाही आऊट केलं. ११७ रनवर दुसरी विकेट पडल्यानंतर १२९ रनवर पाकिस्तानची पाचवी विकेट गेली. फक्त १२ रनच्या मोबदल्यात पाकिस्तानने ४ विकेट गमावल्या आणि सामना भारताच्या बाजूने फिरला. कुलदीप यादवने या मॅचमध्ये ९ ओव्हरमध्ये १ मेडन ओव्हर टाकत ३२ रन देऊन २ विकेट घेतल्या.
या मॅचमध्ये पावसाने वारंवार व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा ८९ रनने पराभव झाला. रोहित शर्माच्या १४० रनच्या खेळीमुळे भारताने ५० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून ३३६ रन केले. याचा आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला ४० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून २१२ रनपर्यंतच मजल मारता आली.
मॅचमध्ये तिसऱ्यांदा पाऊस पडल्यानंतर पाकिस्तानला ४० ओव्हरमध्ये ३०२ रनचं आव्हान मिळालं. तिसऱ्यावेळी पाऊस आला तेव्हा पाकिस्तानने ३५ ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १६६ रन केले होते.
पाकिस्तानकडून फकर जमानने सर्वाधिक ६२ रन केले. भारताकडून कुलदीप यादव, विजय शंकर आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. याचबरोबर भारताचं वर्ल्ड कपमधलं पाकिस्तानविरुद्धचं विजयाचं रेकॉर्ड कायम आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सगळ्या ७ मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं आहे. १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं आहे.