मुंबई : पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आज भारतीय टीमची घोषणा होणार आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समिती मुंबईमध्ये वर्ल्ड कपसाठीची टीम जाहीर करेल. भारतीय टीममध्ये निवड होणाऱ्या बहुतेक खेळाडूंची नावं निश्चित आहेत. पण एखाद दुसऱ्या खेळाडूंबद्दल अजूनही निर्णय झालेला नाही. दुसरा विकेट कीपर म्हणून दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची, ही निवड समितीपुढे डोकेदुखी ठरू शकते. ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
भारतीय टीमची निवड व्हायच्या एक दिवस आधीच दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतला आयपीएल मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. पण दोघांनाही खास कामगिरी करता आली नाही. कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने १८ रन केले, तर दिल्लीकडून खेळणाऱ्या पंतला फक्त २३ रन करता आल्या. आयपीएलमधली कामगिरी वर्ल्ड कपसाठीची टीम निवडताना ग्राह्य धरली जाणार नाही, हे एमएसके प्रसाद यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
निवड समितीची बैठक होईल तेव्हा त्यांच्यासमोर चौथ्या क्रमांकावरचा बॅट्समन, दुसरा विकेट कीपर आणि चौथा फास्ट बॉलर किंवा तिसरा स्पिनर या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. रवींद्र जडेजाला तिसरा स्पिनर म्हणून संधी देण्यात आली तर जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या तीन फास्ट बॉलरची टीममध्ये वर्णी लागू शकते.
युवा ऋषभ पंतला एक्स-फॅक्टर म्हणून बघितलं जात आहे. स्फोटक खेळाडू म्हणून ऋषभ पंतने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तर कार्तिक हा एक अनुभवी खेळाडू आहे. वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत कार्तिक शांत राहण्यात सक्षम आहे.
२१ वर्षांच्या ऋषभ पंतने आत्तापर्यंत ५ मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्याने ९३ रन केले आहेत. वनडेमध्ये ऋषभ पंतचा सर्वाधिक स्कोअर ३६ रन आहे. तर ३६ वर्षांच्या दिनेश कार्तिकने ९१ वनडे मॅचमध्ये १,७३८ रन केले आहेत. दिनेश कार्तिकचा सर्वाधिक स्कोअर ७९ रन आहे. दिनेश कार्तिक हा सध्या भारतीय टीममधल्या सगळ्यात वरिष्ठ खेळाडूपैकी एक आहे. कार्तिकने सप्टेंबर २००४ साली पहिली वनडे खेळली होती. यानंतर तीन महिन्यांनी एमएस धोनीला पहिली वनडे खेळण्याची संधी मिळाली होती.