World Cup 2019 : शोएब अख्तरची इच्छा, 'या टीमने जिंकावा वर्ल्ड कप'

क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व काही नवीन नाही. 

Updated: Jul 8, 2019, 10:06 PM IST
World Cup 2019 : शोएब अख्तरची इच्छा, 'या टीमने जिंकावा वर्ल्ड कप' title=

मुंबई : क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व काही नवीन नाही. वर्ल्ड कपमध्ये जर हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडत असतील तर मात्र या मुकाबल्याला वेगळाच रंग चढतो. अनेक वेळा दोन्ही देशांच्या खेळाडूंची मैदानातली बाचाबाचीही आपण पाहतो. यामध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तरचं नाव सगळ्यात पुढे घ्यावं लागेल. पण यावेळीमात्र शोएब अख्तरने भारतीय टीमने वर्ल्ड कप जिंकावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

यंदाचा वर्ल्ड कप भारतीय उपखंडात यावा यासाठी शोएबने भारताचं समर्थन केलं आहे. अख्तर आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला, 'न्यूझीलंड दबावात चांगलं खेळू शकत नाही. त्यांनी पुन्हा स्वत:ला चोकर्स सिद्ध करु नये, पण वर्ल्ड कप उपखंडात यावा, असं मला मनापासून वाटतं. त्यासाठी मी भारताला पाठिंबा देत आहे. न्यूझीलंड १९७५ वर्ल्ड कपपासून मोठ्या स्पर्धांमध्ये अपयशी ठरत आहे. तेव्हापासूनच त्यांची अशी परिस्थिती आहे.'

रोहितची समज सर्वोत्तम

शोएब अख्तरने भारताचा ओपनर रोहित शर्माचं कौतुक केलं. 'रोहितचं टायमिंग आणि शॉटची निवड उत्कृष्ट आहे. खेळाबद्दल त्याची समजही सर्वोत्तम आहे. केएल राहुलनेही शतक केलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. एक-दोन रन कधी काढायचा आणि मोठे शॉट कधी मारायचे ते रोहितला समजतं,' असं वक्तव्य शोएबने केलं. रोहित शर्माने या वर्ल्ड कपच्या ८ मॅचमध्ये ५ शतकं केली आहेत. एकाच वर्ल्ड कपमध्ये एवढी शतकं करण्याचा हा विक्रम आहे.

पाकिस्तान न्यूझीलंडपेक्षा चांगलं खेळलं

'नेट रनरेट महत्त्वाचा आहे, पण मला यांच गणित समजत नाही. पाकिस्तान आणि बांगलादेशने न्यूझीलंडपेक्षा चांगलं क्रिकेट खेळलं, पण तरीही या टीम सेमी फायनलला पोहोचल्या नाहीत. याचं मला दु:ख आहे. पाकिस्तानची टीम सेमी फायनलपर्यंत पोहोचेल, असं मला वाटलं होतं,' अशी प्रतिक्रिया शोएबने दिली.