लीड्स : २०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर राहिली. यामुळे सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी आणि ऑस्ट्रेलियाचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. ७ जुलैला भारत-न्यूझीलंड आणि ९ जुलैला ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात सेमी फायनलच्या मॅच होतील. या दोन मॅचमध्ये विजय मिळवलेल्या टीम १४ जुलैला लॉर्ड्सवर फायनल खेळतील.
ग्रुप स्टेजच्या आपल्या शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडियाने युझवेंद्र चहल आणि मोहम्मद शमीला विश्रांती दिली होती. या दोघांच्याऐवजी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आली होती. आता सेमी फायनलमध्ये विराट कोणाला खेळवणार हा प्रश्न आहे.
सेमी फायनलआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराटला मोलाचा सल्ला दिला आहे. सेमी फायनलमध्ये भारताने दिनेश कार्तिकऐवजी केदार जाधवला संधी द्यावी आणि भुवनेश्वर कुमारच्याऐवजी मोहम्मद शमीला टीममध्ये घ्यावं, असं गांगुली म्हणाला. दिनेश कार्तिकचा सातव्या क्रमांकावर वापर करण्याऐवजी केदारला संधी दिली तर त्याचा सहावा बॉलर म्हणूनही उपयोग होऊ शकतो. तसंच जडेजा टीममध्ये असल्यामुळे बॅटिंगही तळापर्यंत जाते, असं मत सौरव गांगुलीने मांडलं.
भुवनेश्वर कुमार हा शेवटच्या काही ओव्हरमध्ये रन रोखण्यासाठी चांगली बॉलिंग करतो. तर मोहम्मद शमीने मात्र गेल्या काही मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त रन दिल्या. असं असलं तरी सेमी फायनलसारख्या मॅचमध्ये तुम्हाला विकेट घेणाऱ्या बॉलरची गरज असते. मोहम्मद शमी विकेट काढून देणारा बॉलर आहे, असं गांगुली म्हणाला.
भुवनेश्वर कुमारला या वर्ल्ड कपमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली होती. यानंतर काही मॅचला त्याला मुकावं लागलं. यानंतर मिळालेल्या संधीचं मोहम्मद शमीने सोनं केलं. ४ मॅचमध्येच शमीने १४ विकेट घेतल्या, यात अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये हॅट्रिकचा समावेश आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधून भुवनेश्वरनं पुन्हा एकदा टीममध्ये पुनरागमन केलं, पण तो महाग ठरला. भुवनेश्वरने १० ओव्हरमध्ये ७३ रन देऊन १ विकेट घेतली.
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह