World Cup 2019 : 'धवनऐवजी या खेळाडूला संधी द्या'; गावसकर-पीटरसनचा आग्रह

वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

Updated: Jun 11, 2019, 09:08 PM IST
World Cup 2019 : 'धवनऐवजी या खेळाडूला संधी द्या'; गावसकर-पीटरसनचा आग्रह title=

लंडन : वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या मॅचआधी टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. ओपनर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे धवन किती दिवस बाहेर राहणार याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. पण तो न्यूझीलंडविरुद्धची मॅच खेळू शकणार नाही, हे निश्चित आहे.

अंगठ्याच्या या दुखापतीमुळे शिखर धवनला उरलेल्या वर्ल्ड कपला मुकावं लागू शकतं. अशा परिस्थितीमध्ये टीम इंडिया शिखर धवनऐवजी कोणाला संधी देणार, याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन या दोघांनी याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. शिखर धवनच्या ऐवजी ऋषभ पंतला संधी देण्यात यावी, अशी मागणी गावसकर आणि पीटरसन यांनी केली आहे.

'ऋषभ पंतने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. तो सुरुवातीपासूनच भारतीय टीममध्ये हवा होता. पण पुढच्या १८ दिवसांमध्ये शिखर धवन फिट होणार असं डॉक्टरांनी सांगितलं, तर आपण वाट बघितली पाहिजे. जर शिखर धवन ३० जूनला इंग्लंडविरुद्धची मॅच मुकला तरी चालेल,' असं गावसकर म्हणाले.

केव्हिन पीटरसन यानेही शिखर धवनऐवजी ऋषभ पंतला संधी देण्याचं समर्थन केलं आहे. 'शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर, ऋषभ पंतला बोलवा. केएल राहुलला ओपनिंगला पाठवा आणि पंतला चौथ्या क्रमांकावर,' असं ट्विट पीटरसनने केलं आहे.

ऋषभ पंत, अंबाती रायुडू, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे शिखर धवनऐवजी टीममध्ये निवड होण्यासाठीचे दावेदार आहेत. हे सगळे खेळाडू ओपनर नसले तरी आता रोहित शर्मासोबत केएल राहुल ओपनिंगला येईल. आणि चौथ्या क्रमांकासाठी या खेळाडूंचा विचार होण्याची शक्यता आहे.

१५ एप्रिलला टीम इंडियाने वर्ल्ड कपसाठीच्या टीमची घोषणा केली होती. तेव्हा निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी ऋषभ पंत आणि अंबाती रायुडू यांची नावं घेतली होती. त्यामुळे या दोघांपैकी एकाचीच निवड होण्याची शक्यता जास्त आहे.

मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांना इंग्लंडमध्ये भारत ए कडून खेळण्याचा अनुभव आहे. जर यांच्यापैकी एकाची निवड झाली तर ते थेट रोहित शर्मासोबत ओपनिंगला येतील. तर अजिंक्य रहाणे हा सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्मासोबत केएल राहुल ओपनिंगला खेळेल हे निश्चित आहे. या मॅचमध्ये शिखर धवनऐवजी बदली खेळाडू पोहोचला नाही तर चौथ्या क्रमांकासाठी कर्णधार विराट कोहलीकडे दिनेश कार्तिक आणि विजय शंकरचा पर्याय उपलब्ध आहे. किंवा विराट चौथ्या क्रमांकावर धोनीला खेळवून रवींद्र जडेजाचाही विचार करू शकतो. बॅटिंग आणि बॉलिंगसोबतच चपळ फिल्डिंग ही रवींद्र जडेजाची जमेची बाजू आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ३६ रननी विजय झाला. या मॅचमध्ये शिखर धवनने ११७ रनची शानदार खेळी केली. याच मॅचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईलने टाकलेला बॉल शिखर धवनच्या अंगठ्याला लागला. तरीही धवनने बॅटिंग सुरुच ठेवली. बॅटिंगनंतर धवन फिल्डिंगला मात्र आला नाही. टीम इंडियाने ठेवलेल्या ३५२ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ५० ओव्हरमध्ये ३१६ रनवर ऑल आऊट झाला.