World Cup 2019 : भारत X दक्षिण आफ्रिका, उत्सुकता शिगेला

विश्वचषकातील प्रबळ दावेदारांपैकी एक असलेला भारतीय क्रिकेट संघ आता क्रिकेटच्या रणभूमीत उतरणार आहे

Updated: Jun 5, 2019, 10:13 AM IST
World Cup 2019 : भारत X दक्षिण आफ्रिका, उत्सुकता शिगेला title=

मुंबई : क्रिकेट विश्वचषक सुरु होऊन काही दिवस झाले असले तरी आता विश्वचषकाला खरी रंगत चढणार आहे. कारण भारतीय क्रिकेट संघ आता क्रिकेटच्या रणभूमीत उतरणार आहे. आज भारताचा पहिलाच मुकाबला हा दक्षिण आफ्रिकेशी रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेची सध्याची झालेली स्थिती पाहता भारतासाठी महाकठीण असलेला पेपर आता सोपा झालाय. मात्र जर वरुणराजानं काही वक्रदृष्टी दाखवली तर मात्र या रंगाचा बेरंग होऊ शकतो. 

विश्वचषकातील प्रबळ दावेदारांपैकी एक असलेला भारतीय क्रिकेट संघ आता क्रिकेटच्या रणभूमीत उतरणार आहे. यामुळे या क्रिकेटच्या महायुद्धाला आता खरी धार चढणार आहे. भारतीय क्रिकेट संघावर नजर टाकल्यास संपूर्ण ताकदीनीशी भारतीय संघ हा रणभूमीत उतरतोय. भारताची फलंदाजी ही मजबूत असून यावेळी गोलंदाजी विभागही चांगला आहे. ज्या चौथ्या स्थानाची भारताला चिंता वाटत होती. त्या चौथ्या स्थानी सराव सामन्यात लोकेश राहुलनं शतक झळकावलंय. तर जो कुलदीप यादव आयपीएलमध्ये आपली छाप सोडू शकला नव्हता. त्यानंही सराव सामन्यात कमबॅक केलंय. मात्र सराव सामन्यात आपल्या सलामीवीरांना छाप सोडता आलेली नाही हे दुर्लक्षित करुन चालणार नाही. 

तर तिकडे दक्षिण आफ्रिकनं ब्रिगेडची स्थिती पहिल्या दोन पराभवांनी आणि दुखापतींनी अगदीच केविलवाणी झालीय. सुरुवातीलाच यजमान इंग्लंडनं तब्बल १०४ धावांनी आणि बांग्लादेशनं केलेल्या लाजीरवाण्या पराभवामुळे आफ्रिकनं संघ खचलेला असताना त्यांचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला दुखापतींमुळे थेट विश्वचषकातूनच बाहेर फेकला गेलाय. तर गोलंदाज लुंगी एन्गिडी आणि फलंदाज हाशिम अमलादेखील दुखापतग्रस्त आहेत. प्रतिस्पर्ध्यांची या अवस्थेमुळे भारतीय गोटात नक्कीच आनंदाचं वातावरण असेल. मात्र, विश्वचषकामध्ये प्रोटीयाज भारतावर वरचढ चढलाय हे इतिहास सांगतो. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकामध्ये ४ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील केवळ एकच लढत भारत जिंकू शकलाय. तर दक्षिण आफ्रिकेनं ३ वेळा बाजी मारलीय. तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ८३ सामने खेळले गेले आहेत. यातील ३४ सामन्यांमध्ये भारत तर ४६ वेळा प्रोटीयाज विजयी झालेत. तर ३ सामने अनिर्णित राहिलेत.

रोहित, धवन, विराट, लोकेश राहुल, धोनी, हार्दिकवर भारताच्या फलंदाजीची मदार असेल. तर बुमराह, शमी, चहल आणि कुलदीपवर भारतीय़ गोलंदाजीची जबाबदारी असेल. आफ्रिकेच्या फलंदाजीची भिस्त ही डी कॉक, प्लेसिस, डेविड मिलर आणि ड्युमिनीवर असेल. तर रबाडा आणि इम्रान ताहिरवर आता त्यांच्या गोलंदाजीच्या आशा एकवटल्या असतील. पराभव आणि दुखापतींमुळे दक्षिण आफ्रिकन संघाच्या मनोधैर्यावर नक्कीच विपरित परिणाम झाला असेल. तर भारतासाठी आता आफ्रिकेचं कडवं आव्हानं राहिलेलं असं दिसतंय. यामुळे भारत सहज विजयी सलामी देईल, अशी आशा वाटतेय.