साऊथम्पटन : २०१९ वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा पहिला सामना आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. साऊथम्पटनच्या एजेस बाऊल स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये हा सामना रंगेल. आतापर्यंतच्या प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये बॅटिंग हीच टीम इंडियाची प्रमुख ताकद राहिली होती. यंदाही बॅटिंग मजबूत दिसत असली, तरी त्यामध्ये काही अडथळे आहेत.
सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम ओपनर पैकी एक असलेली जोडी म्हणजे रोहित शर्मा आणि शिखर धवन. चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ही सलामीची गट्टी अशी काही जमलीय की त्यांनी अनेक सामन्यांमध्ये भारताला उत्तम सलामी दिली. या जोडीनं १०१ सामन्यांमध्ये ४,५४१ रन्स सलामीला केल्या आहेत. या रन्स त्यांनी ४५.४१च्या सरासरीनं केल्या.
रोहित-शिखर सलामीच्या जागेसाठी प्रस्थापित झालेत. धवन हा अगदी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा धारण करत बॉलरवर हल्लाबोल चढवतो. तर रोहित खेळपट्टीवर जम बसवायला थोडा वेळ घेतो आणि मग धुलाई करतो.
जगातील आतापर्यंतच्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक असलेला विराट कोहली हा तिसऱ्या स्थानी येतो. गेल्या काही वर्षांमध्ये विराटनं सातत्यानं केलेल्या सर्वोत्कृष्ट बॅटिंगच्या जोरावर आपलं तिसरं स्थान प्रस्थापित केलं. विराटनं २२७ वनडेमध्ये १०,८४३ धावा केल्या असून ४१ शतकं झळकावली आहेत. त्यानं ५९.५८ च्या सरासरीनं या धावा कुटल्या आहेत. विराट हा भारतीय बॅटिंगचा आधारस्तंभ आहे.
चौथ्या स्थानाचा बॅट्समन निवडताना निवड समितीचीच कसोटी लागली होती. मात्र अखेर लोकेश राहुल या भरवशाच्या बॅट्समनसोबत विजय शंकरलाही पर्याय म्हणून स्थान देण्यात आलं. यामुळे चौथ्या स्थानासाठीची चिंता मिटवण्यात आलीय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या दोन्ही खेळाडूंनी प्रभावशाली कामगिरी केली होती.
धोनीच्या रुपात टीम इंडियाकडे सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे. मध्यला ओव्हरपासून ते अगदी शेवटपर्यंत धोनी भारतीय बॅटिंगची धुरा वाहू शकतो. त्याचं फिनिशरचं कौशल्य २०११चा वर्ल्ड कप आणि इतरही काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं आहे. धोनीनं ३४१ वनडे मॅचमध्ये १०,५०० रन्स ५०.७२च्या सरासरीनं केल्या आहेत.
केदार जाधवनं आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर टीममध्ये स्थान पटकावलं आहे. केदार हा आक्रमक बॅट्समन असून तोदेखील धोनीसारखा फिनिशरची भूमिका उत्तम बजावतो. केदारनं ५० वनडे सामन्यांमध्ये १,१७४ रन्स केल्या आहेत. त्यानं ४३.०५च्या सरासरीनं या रन्स केल्या आहेत. तर दिनेश कार्तिक गेले कित्येक दिवस टीमच्या बाहेर होता. गेल्या दोन वर्षात त्यानं आपल्या खेळात सुधारणा केल्या आहेत. धोनीला पर्यायी विकेट कीपर म्हणून तो टीममध्ये आल्यास त्याला धोनीच्या फिनिशरची जबाबदार पार पाडावी लागेल.
फटाफट रन्स जमवणं ही हार्दिक पांड्याची खासियत आहे. वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत सातव्या क्रमांकासाठी हार्दिक हा अगदी योग्य बॅट्समन आहे. हार्दिकनं ४५ सामन्यांमध्ये २९.२च्या सरासरीनं ७३१ रन्स केल्या आहेत.
अगदी सातव्या क्रमांकापर्यंत भारताची बॅटिंग आहे. दरम्यान मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा झाल्यास क्वचित प्रसंगी जडेजा, कुलदीप, चहल यांच्यापैकी कोणावरही बॅटिंगची जबाबदारी येऊन पडू शकते. पण उपलब्ध असलेल्या बॅट्समनमध्ये विराट कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.