World Cup 2019 : टीम इंडियाचा मोठा विजय, कांगारुंना ३६ रननी लोळवलं

टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमधला लागोपाठ दुसरा विजय मिळवला आहे.

Updated: Jun 9, 2019, 11:36 PM IST
World Cup 2019 : टीम इंडियाचा मोठा विजय, कांगारुंना ३६ रननी लोळवलं title=

लंडन : टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमधला लागोपाठ दुसरा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ३६ रननी विजय झाला आहे. ३५३ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ५० ओव्हरमध्ये ३१६ रनवर ऑल आऊट झाला.

टीम इंडियाने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली असली, तरी त्यांना रनची गती राखता आली नाही. स्टिव्हन स्मिथने ७० बॉलमध्ये ६९ रन केले. तर ऍलेक्स कारेने ३५ बॉलमध्ये नाबाद ५५ रनची खेळी करून संघर्ष कायम ठेवला. डेव्हिड वॉर्नरने ८४ बॉलमध्ये ५६ रन केले.

टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर युझवेंद्र चहलने २ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू रन आऊट झाले.

या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवनने हा निर्णय योग्य ठरवला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी २२.३ ओव्हरमध्ये १२७ रनची पार्टनरशीप केली. रोहितची विकेट गेल्यानंतर शिखर धवनने विराटसोबत स्कोअर २२० रनपर्यंत पोहोचवला. शिखर धवन १०९ बॉलमध्ये ११७ रन करून आऊट झाला. हार्दिक पांड्याने २७ बॉलमध्ये ४८ रन आणि धोनीने १४ बॉलमध्ये २७ रनची खेळी केली. कर्णधार विराट कोहली ७७ बॉलमध्ये ८२ रन करून माघारी परतला. केएल राहुलने ३ बॉलमध्ये ११ रन करुन टीम इंडियाचा स्कोअर ३५०च्या पुढे पोहोचवला.

टीम इंडियाचा आतापर्यंतच्या सगळ्या वर्ल्ड कपमधला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा चौथा विजय आहे. याआधी १९८३, १९८७, २०११ आणि २०१५ या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.

वर्ल्ड कपमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा १९९९ सालानंतरचा हा पहिलाच पराभव आहे. १९९९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना लागोपाठ १९ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. तसंच मागच्या ११ वनडे मॅचमधला ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच पराभव आहे.