'खराब अम्पायरिंगमुळे....', पाकिस्तानच्या पराभवानंतर हरभजन सिंग संतापला: इरफान पठाण म्हणाला 'इतकं...'

पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सामन्यानंतर अंपायरिंगवरुन वाद निर्माण झाला आहे. यानंतर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी पोस्ट शेअर करत पाकिस्तानी संघाचं समर्थन केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 28, 2023, 01:17 PM IST
'खराब अम्पायरिंगमुळे....', पाकिस्तानच्या पराभवानंतर हरभजन सिंग संतापला: इरफान पठाण म्हणाला 'इतकं...' title=

पाकिस्तान क्रिकेट संघ वर्ल्डकपमध्ये सलग 4 सामन्यात पराभूत झालं आहे. चेन्नईत 27 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 1 गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवासह बाबर आझमच्या नेतृत्वातील संघ सेमी-फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यताही धूसर झाली आहे. पाकिस्तान संघाला आता दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. 

दरम्यान या सामन्यातील डीआरएसवरुन वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान संघ 46 व्या ओव्हरलाच सामना जिंकला असता. हारिस रौफने टाकलेला चेंडू तरबेज शम्सीच्या पॅडवर लागली होती. यानंतर आऊटची अपील केली असता, अम्पायरने नॉट आऊट दिलं. यानंतर पाकिस्तान संघाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू इम्पॅक्ट विकेटच्या लाइनवर नसल्याचं दिसलं. तसंच एक चेंडू वाईड दिल्यानेही वाद निर्माण झाला आहे. 

चेंडू डाव्या स्टम्पवर धडकत होता. पण अंपायर्स कॉल असल्याने शम्सी वाचला. यानंतर हारिस मैदानातच डोकं पकडून खाली बसला होता. आता याच नियमावरुन वाद निर्माण झाला आहे. भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग यानेही ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला सामन्यानंतर डीआरएसमुळे परिणाम भोगावे लागले का? असं विचारण्यात आलं त्याने तंत्रज्ञानाला दोष देण्यास नकार दिला. "डीआरएस तुमच्या बाजूनेही निर्णय देऊ शकतो. काही वेळा तो समोरच्याच्या बाजूने असतो. हा खेळाचा भाग आहे. आम्ही उर्वरित सामन्यात चांगलं खेळण्याचा प्रयत्न करु. आणि कुठे पोहोचतोय ते पहू," असं बाबर म्हणाला.

हरभजन सिंगचा पाकिस्तानला पाठिंबा

हरभजन सिंग याने ट्विट करत खराब अम्पायरिंगवरुन संताप व्यक्त केला आहे. भज्जीने आयसीसीला टॅग करत लिहिलं आहे की, "खराब नियम आणि अम्पायरिंगमुळे पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला. हा नियम आता बदलला पाहिजे. जर चेंडू स्टम्पला लागत असेल तर तो बाद आहे. मग अंपायरने आऊट दिलं आहे की नॉट आऊट याच्याने फरक पडता कामा नये. अन्यथा तंत्रज्ञानाचा काय फायदा?".

भज्जीने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आज कोण जिंकलं किंवा हारलं याने काही फरक पडत नाही. कोण खेळत आहे याने मला काही फरक पडत नाही, पण नियम बरोबर नाहीत....उद्या आपल्यासोबतही असं होऊ शकतं. त्यांच्या (अंपायर) चुकीमुळे आपण फायनल हरलो तर? मग काय होईल? माझ्या मते तो नाबाद होता. अम्पायरला वाचवण्यात आलं.

इरफान पठाणचं ट्वीट

इरफान पठाणने ट्विट करत लिहिलं आहे की, "वाईड आणि एलबीडब्ल्यू असे दोन निर्णय पाकिस्तानच्या विरोधात गेले. दक्षिण आफ्रिकेला नशिबाची साथ मिळाली असं दिसत आहे"