World Cup सुरु असतानाच बाबर आझमची कर्णधारपदावरुन उचलबांगडी? शाहीन आफ्रिदीला कर्णधार करण्याची मागणी

World Cup 2023 Pakistan Captain: भारताविरुद्ध 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानला मोठा पराभवाचं तोंड पहावं लागलं. पाकिस्तानला भारताने 7 विकेट्स आणि 117 चेंडू राखून पराभूत केल्याने एका नव्याच वादाला तोंड फुटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 17, 2023, 07:44 AM IST
World Cup सुरु असतानाच बाबर आझमची कर्णधारपदावरुन उचलबांगडी? शाहीन आफ्रिदीला कर्णधार करण्याची मागणी title=
पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण

World Cup 2023 Pakistan Captain: भारतात वर्ल्ड कपची स्पर्धा दिवसोंदिवस रंजक होत असताना दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या वेगळीच चर्चा सुरु आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानचा संघ भारताकडून 7 विकेट्सने पराभत झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांबरोबर माजी क्रिकेटपटूंनीही बाबर आझमला लक्ष्य केलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाला केवळ 191 धावा करता आल्या. बाबर आझमने 50 धावांची खेळी केली. भारताने या धावसंख्येचा पाठलाग करताना 117 चेंडू बाकी असताना 3 विकेट्सच्या मोबदल्यात 192 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूंमध्ये 86 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 6 षटकार लगावले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने बाबर आझम पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनाम देऊ शकतो असंही म्हटलं आहे. बाबर आझम पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो. असं झालं तर शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानचा नवीन कर्णधार असावा, असं शोएब मलिकने म्हटलं आहे. मात्र शोएब मलिकच्या या भूमिकेला माजी क्रिकेटपटू मोहम्मद यूसुफने कठोर शब्दांमध्ये विरोध केला आहे.

बाबरने कर्णधार पद सोडलं तर...

'ए स्पोर्ट्स'ला दिलेल्या माहितीनुसार, जर बाबर आझम वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधार पदावरुन पाय उतार होत असेल तर शाहीन शाह आफ्रिदी व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा नवीन कर्णधार असायला हवा. त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्सकडून आक्रमक खेळ करतानाच उत्तम नेतृत्वही केलं होतं, असं शोएब म्हणाला. बाबर आझम खेळाडू म्हणून संघांसाठी उत्तम कामगिरी करत आहे. मात्र कर्णधार म्हणून बाबर आझम अपयशी ठरला आहे, असं विश्लेषण शोएब मलिकने केलं आहे. आशिया चषक 2023 च्या स्पर्धेमध्येही बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाची कामगिरी अगदीच सुमार राहिली. या स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तानला तब्बल 228 धावांनी पराभूत केलं होतं. तसेच पाकिस्तानला श्रीलंकेनेही पराभूत केलं होतं. त्यामुळेच पाकिस्तानला अंतिम सामन्याच्या आधीच स्पर्धेबाहेर पडावं लागलं होतं.

इम्रान खान यांना 3 वेळा दिलेली संधी

पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद यूसुफने 'समा टीव्ही'शी बोलताना वर्ल्ड कप दरम्यान बाबर आझमच्या नेतृत्वावर आपण शंका उपस्थित करता कामा नये असं म्हटलं आहे. अशाप्रकारे त्याच्या नेतृत्वावर शंका घेणं फारच खेदजनक आहे, असं मोहम्मद यूसुफ म्हणाला. पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इम्रान खानचा उल्लेख करत मोहम्मद युसूफने, "1983, 1987 च्या वर्ल्ड कपमध्ये इम्रान खानच कर्णधार होते. मात्र त्यांनी 1992 साली वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळेच बाबर आझमलाही पुरेसा वेळ द्यायला हवा. काही स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारे आपण टोकाच्या गोष्टी बोलू शकत नाही," असं मत मोहम्मद यूसुफने मांडलं.

बाबरची कामगिरी कशी?

बाबर आझमच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तानी संघाने 2021 मध्ये टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला 10 विकेट्सने पराभूत केलं होतं. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास हा पाकिस्तानला मिळवता आलेला एकमेव विजय ठरला होता. 2022 मध्ये बाबरने पाकिस्तानचं नेतृत्व करताना संघाला टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं होतं. शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा इंग्लंडने पराभव केला होता. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने नेदरलँण्ड आणि श्रीलंकेला पराभूत केलं आहे. पाकिस्तानचा पुढील सामना 20 ऑक्टोबर रोजी बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघालाही आपल्या पहिल्या 3 सामन्यांपैकी एका सामन्यातच विजय मिळवता आला आहे.