Rs 24789 Crore Virat Kohli And Rohit Sharma: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील 21 व्या सामन्यामध्ये विराट कोहलीला 49 वं शतक झळकावण्यात अपयश आलं. मात्र विराटच्या 95 धावांच्या खेळीमुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंविरुद्ध विजय मिळवत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेता आली. मात्र विराट कोहलीच्या या भन्नाट खेळीचा फायदा केवळ भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी झाला असं नाही तर या खेळीचा फायदा ऑनलाइन माध्यमातून या सामन्यांचं वेबकास्टींग करणाऱ्या 'डिस्ने प्लस हॉटस्टार'लाही झाला. मुकेश अंबानींच्या मालकीच्या 'जिओ सिनेमा'शी सुरु असलेल्या स्पर्धेत प्रेक्षक संख्येसेठी सुरु असलेल्या चढाओढीमध्ये 'डिस्ने प्लस हॉटस्टार'मध्ये मोठा दिलासा मिळाला आहे.
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान झालेल्या सामन्याने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हा सामना एका क्षणाला ऑनलाइन वेबकास्टींगच्या माध्यमातून तब्बल 4.3 कोटी लोक पाहत होते. कोणत्याही क्रिकेट सामन्याला मिळालेली ही सर्वात मोठी डिजीटल व्ह्यूअरशीप आहे. या विक्रमामुळे 'डिस्ने प्लस हॉटस्टार'ने आधीचे विक्रम मोडीत काढले आहेत. या पूर्वीचा विक्रम हा मागील आठवड्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात झाला होता. या सामन्याचं वेबकास्टींग एका क्षणाला 3.5 कोटी प्रेक्षक पाहत होते.
'डिस्ने प्लस हॉटस्टार'ला मागील काही काळापासून मोठा फटका बसत आहे. प्रामुख्याने मुकेश अंबानींच्या मालकीच्या 'जिओ सिनेमा'ने इंडियन प्रमिअर लीग आणि भारताचे सामने मोफत दाखवण्यास सुरुवात केल्यापासून 'डिस्ने प्लस हॉटस्टार'ला फटका बसत आहे. क्रिकेटच्या प्रसारण हक्कांसंदर्भातील या संघर्षामुळे 'डिस्ने प्लस हॉटस्टार'ने 1 जुलै रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 1.25 कोटी सबस्क्रायबर्स गमावले आहेत. 'डिस्ने प्लस हॉटस्टार'चे जूनच्या शेवटापर्यंत 4.04 कोटी सबस्क्रायबर्स होते. मागील ऑक्टोबरपेक्षा हा आकडा आता 2.1 कोटींनी पडला आहे.
'डिस्ने प्लस हॉटस्टार'ने आशिया चषक स्पर्धा आणि आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचं मोबाईलवरुन मोफत वेबकास्टींग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानींच्या कंपनीने भारत कोणत्याही संघाविरुद्ध ज्या द्विपक्षीय मालिका खेळणार आहे त्याच्या प्रसारणाचे हक्क 5959 कोटींना विकत घेतले आहेत. मात्र त्याचवेळी 'डिस्ने प्लस हॉटस्टार'ने 2024 दरम्यान 2027 आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामने म्हणजेच आयसीसीच्या भारतामधील स्पर्धांअंतर्गत होणारे सामने दाखवण्याचे हक्क तब्बल 24 हजार 789 कोटींना विकत घेतले आहेत.
सध्याची आकडेवारी पाहता 'डिस्ने प्लस हॉटस्टार'ला भारतात सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचा भरपूर फायदा होत असल्याचं चित्र दिसत आहे.