Sunil Gavaskar Angry Indian Flag Issue: वर्ल्ड कप 2023 च्या साखळी फेरीमधील भारताचा पुढील सामना 12 तारखेला नेदरलॅण्डविरुद्ध होणार आहे. भारताने 5 नोव्हेंबर रोजी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 243 रन्सने पराभूत केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला. भारताने विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या पार्टनरशीपच्या जोरावर 326 वर 5 अशी धावसंख्या उभारली. पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्यास्थानी असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताला तगडी झुंज देईल असं वाटत होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावांमध्ये तंबूत परतला.
सामन्यानंतर 77 धावा करणारा श्रेयस अय्यर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि समालोचक मयंती लंगरबरोबर सामन्यासंदर्भात चर्चा करत होता. यावेळेस मयंती लंगर आणि रवी शास्त्रींनी अय्यरला प्रश्न विचारले. मात्र सुनील गावसकर हे संभ्रमावस्थेत दिसले. काहीतरी विचारायचं असूनही ते प्रश्न विचारत नव्हते. मात्र या संभ्रमावस्थेसंदर्भात गावसकर यांनी स्पष्टीकरण दिलं. "होय, मला काहीतरी विचारायचं होतं. मात्र माझं लक्ष विचलित झालं कारण मी समोर एक तिरंगा पाहिला ज्यावर कंपनीचं नाव लिहिलेलं होतं. पण हे अशापद्धतीने राष्ट्रध्वजावर नाव लिहिण्यास परवानगी नाही. भारतीय राष्ट्रध्वजावर असं काहीही लिहून त्याचा अपमान करता येत नाही," असं गावसकर यांनी संतापून म्हटलं.
"ज्यांनी झेंडा पकडला होता ते आता निघून गेले. मात्र मला वाटतं की पोलिसांनी पुढच्या वेळेस असं काही पहिलं तर ते झेंडे ताब्यात घ्यावेत. तसेच असे झेंडे बाळगणाऱ्यांना पोलिसांनी पुढल्या वेळेस अशाप्रकारे कोणत्याही कंपनीची, प्रोडक्टची जाहीरात भारतीय राष्ट्रध्वजावर करता येत नाही असं सांगितलं पाहिजे. हे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकरता येणार नाही. मला माफ करा मी यामुळे थोडा विचलित झालो. मला कल्पना आहे की रवी शास्त्रींना मी श्रेयसला प्रश्न विचारावा असं वाटतं होतं. मात्र मी केवळ त्या झेंडा पकडणाऱ्यांकडे पाहत होतो आणि त्यांना इशाऱ्यामधून सांगण्याचा प्रयत्न करत होतो," असं गावसकर म्हणाले.
— (@me_sanjureddy) November 5, 2023
गावसकर यांच्या या भूमिकेचं नेटकऱ्यांची कौतुक केलं आहे. अनेकांनी अशाप्रकारे सर्वांनीच जागृक राहायला पाहिजे असं म्हटलं आहे. भारतीय सामन्यांसाठी मोठ्याप्रमाणात चाहत्यांची गर्दी होत असून अनेकदा हटके पोस्टर्स लक्ष वेधून घेतात. मात्र गावसकर यांनी मांडलेला मुद्दाही विचारात घेणं गरजेचं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.