Anuska Sharma Reacts On Virat Kohli Instagram Story: आजपासून एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्यापासून या 45 दिवस चालणाऱ्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र या स्पर्धेच्या आधीच विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन एक सूचना केली आहे. या सूचनेवर आता त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही इन्स्टाग्राम स्टोरीवरुनच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज विराट कोहली सध्या चर्चेत आहे. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच अचानक संघाची साथ सोडून मुंबईत पत्नी अनुष्काला भेटण्यासाठी विराट आल्याने अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा सुरु आहे. त्यातच विराटला आणखीन एक गोष्ट सतावत असल्याचं त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवरुन सांगितलं. यावर अनुष्कानेही प्रतिक्रिया नोंदवली आहे. विराटने इन्स्टाग्राम स्टोरीमधून अनेक निकटवर्तीय, मित्र आणि नातेवाईक आपल्याकडे वर्ल्डकपच्या सामन्यांसाठी तिकीटांबद्दल विचारणा करत असल्याचं सूचित केलं आहे. या नकोश्या मागण्यांना विराट कंटाळल्याचा अंदाज त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन येत आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची मदत तिकीटांसाठी मिळेल अशी अपेक्षा ठेऊ नका असं विराटने सांगितलं आहे.
"वर्ल्डकप स्पर्धा जवळ येत असताना मला माझ्या सर्व मित्रांना फार प्रेमाने हे सांगायचं आहे की या संपूर्ण स्पर्धेमध्ये माझ्याकडे तिकीटांसाठी विचारणा करु नका. तुम्ही तुमच्या घरुनच या वर्ल्डकपच्या सामन्यांचा आनंद घ्या," असा मजकूर विराटने इन्स्टाग्राम स्टोरीमधून पोस्ट केला आहे.
आता विराटच्या या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही चाहत्यांना एक सल्ला दिला आहे. विराटची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत अनुष्काने, "...आणि मला यामध्ये एका गोष्टीचा समावेश करायचा आहे तो म्हणजे तुमच्या मेसेजला उत्तर मिळालं नाही तर मदतीसाठी मला रिक्वेस्ट करु नका. तुम्ही जो समजूतदारपणा दाखवत आहात त्यासाठी धन्यवाद," असं म्हटलं आहे. तिने हसणारे इमोजी, नमस्काराचे इमोजी या स्टोरीत वापरले आहेत. विराट आणि अनुष्का यांच्या या पोस्टवरुन मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडे सातत्याने भारतीय सामन्यांसाठीच्या तिकीटांची विचारणा केली जात असल्याचं उघड होत आहे.
अशाप्रकारे तिकीटांची मागणी केवळ विराटकडेच केली जाते असं नाही. यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबियांबरोबरच मित्रांकडूनही तिकीटांसाठी विचारणा होत असल्याचं म्हटलं आहे. अनेक खेळाडूंनी वेळोवेळी आपण अशापद्धतीने तिकीटांची व्यवस्था करु शकणार नाही असं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. सामन्याच्या सरावावर लक्ष केंद्रीत करावं की या असल्या मागण्या पूर्ण कराव्यात असा संभ्रम खेळाडूंमध्ये अशा वेळेस निर्माण होतो असंही काही खेळाडूंनी यापूर्वी म्हटलं आहे.