नवी दिल्ली: भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारला बुधवारी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या चार वर्षांमध्ये सुशील कुमार एकही कुस्ती हरला नव्हता. आगामी आशियाई स्पर्धेच्यादृष्टीने सुशील कुमारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जॉर्जियात सुरु असणाऱ्या तिबलिसी ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 74 किलो वजनी गटात पोलंडच्या आंद्रेज पिटोर याने सुशील कुमारचा 4-8 असा पराभव केला.
सुशील कुमारने काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक जिंकले होते. ही कामगिरी पाहता भारतीय कुस्ती फेडरेशनने गेल्याच महिन्यात झालेल्या सराव सामन्यांमधून सुशील कुमारला विश्रांती दिली होती. मात्र, आजच्या पराभवामुळे आशियाई स्पर्धेतील सुशीलच्या कामगिरीविषयी शंका निर्माण झाली आहे. सुशील कुमारला 2014 साली इटली येथे फ्रान्सच्या ल्युका लॅम्पिस याने हरवले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षात सुशील कुमार एकही कुस्ती हरलेला नाही. मध्यंतरी सुशील कुमारने दोन वर्षांची विश्रांती घेतली होती. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाच्या टारगेट ऑलिम्पिक पोडिअम स्कीम अंतर्गत तो पुन्हा रिंगणात उतरला होता.