Wrestlers Protest: भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आता आक्रमक झाले आहेत. कुस्तीगिरांनी आपली पदकं गंगेत फेकून देण्याचा निर्णय घेतला आहे. हरिद्वार येथे आज संध्याकाळी सर्व कुस्तीगीर गंगेच्या काठी पोहोचणार असून, त्यानंतर पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Malik) ट्वीटरला (Twitter) कुस्तीगिरांनी लिहिलेलं पत्र शेअर करत ही माहिती दिली आहे. जर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचा आवाज ऐकला नाही तर आम्ही पदकं गंगेत फेकून देऊ असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.
कुस्तीगीर बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक तिघांनी सोशल मीडियावर पत्र शेअर केलं आहे. "आम्ही मेडल गंगेत विसर्जित करणार आहोत. कारण ही गंगा जितकी पवित्र मानतो, त्याच पवित्रतेने आम्ही मेहनत करत हे मेडल्स मिळवले आहेत," अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) May 30, 2023
बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात कुस्तीगीर गेल्या एका महिन्यापेक्षाही अधिक काळापासून दिल्लीत धरणे आंदोलन करत आहेत. मात्र 28 मे रोजी दिल्ली पोलिसांनी कुस्तीगिरांविरोधात केलेल्या कारवाईने सर्व सीमा ओलांडल्या. जंतर मंतरपासून (Jantar Mantar) ते नव्या संसद भवनपर्यंत (New Parliamentary Builsing) महापंचायतीत सहभागी होण्यासाठी निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्यांना रस्त्यावरुन अक्षरश: फरफटत नेण्यात आलं. यानंतर देशभरात संतापाची लाट असून, कुस्तीगीरही आक्रमक झाले आहेत.
कुस्तीगिरांनी पत्रात लिहिलं आहे की "28 मे रोजी जे काही झालं ते तुम्ही सर्वांना पाहिलं आहे. पोलिसांनी आम्हाला कशी वागणूक दिली, कशाप्रकारे आम्हाला अटक करण्यात आली. आम्ही शांततेत आंदोलन करत होते. पोलिसांनी आमच्या आंदोलनस्थळाची नासधूस करत आमच्याकडून काढून घेतलं आहे. आणि दुसऱ्यात दिवशी आमच्याविरोधात गंभीर प्रकरणात FIR दाखल केले आहेत. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण झाल्याप्रकरणी आम्ही न्याय मागत कोणता गुन्हा करत आहोत का? पोलीस आणि यंत्रणा आम्हाला गुन्हेगाराप्रमाणे का वागवत आहेत? दुसरीकडे आरोपी जाहीर सभांमधून आमच्यावर भाष्य करत आहेत. टीव्हीवर महिला कुस्तीपटूंसंबंधी आपल्या गुन्ह्यांची कबूली देत हसण्यात ती बदलली जात आहे".
पदक आमचा जीव, आत्मा आहे. हे पदक गंगेत विसर्जित केल्यानंतर आमच्या जगण्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार आहोत. इंडिया गेट आपल्या त्या शहिदांची जागा आहे, ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले. आम्ही त्यांच्याइतके पवित्र नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना आमच्या भावना त्या सैनिकांसारख्याच आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. आता लोकांनी कोणाच्या बाजूने उभं राहायचं हा निर्णय घ्यायचा आहे असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) May 30, 2023
दिल्लीत झालेल्या झटापटीनंतर पोलिसांनी विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दंगलीचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.