'मग काय तुझ्यासारखं घरी...'; ट्रोलरला भारतीय महिला क्रिकेटपटूचे सडेतोड उत्तर

 संजना गणेशनला ट्रोल करण्यात आल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेटपटूंना ट्रोल करण्यात येत आहे

Updated: Nov 16, 2022, 12:02 PM IST
'मग काय तुझ्यासारखं घरी...'; ट्रोलरला भारतीय महिला क्रिकेटपटूचे सडेतोड उत्तर title=
(फोटो सौजन्य - BCCI)

टी-20 मधील (T20 World Cup) मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघातील (Team India) खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल (Troll) करण्यात येत आहे. रोहित शर्मा, केएल राहुल हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. अशाच ट्रोलर्सचे सोशल मीडियावर सध्या प्रमाण वाढत चाललंय. अशा प्रकारचे युजर्स सोशल मीडियावर त्या व्यक्तीविरुद्ध नकारात्मकता पसरवत असतात. नुकतीच जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनच्या (sanjana ganesan) बाबतही असाच काहीसा प्रकार घडला होता. मात्र संजना गणेशनने ट्रोल करणाऱ्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. पण आता भारतीय महिला संघाच्या खेळाडूंनाही ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर (Social Media) त्यांच्यासोबत गैरवर्तन आणि नकारात्मकता पसरवली जात आहे.

मात्र भारतीय महिला संघातील खेळाडूने नेटकऱ्याला दिलेल्या उत्तराने ट्रोलरची चांगलीच चपराक बसली. भारतीय महिला क्रिकेटर यास्तिका भाटियासोबत (yastika bhatia) हा प्रसंग घडला आहे. एका यूजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण ती गप्प बसली नाही आणि ट्रोल करणाऱ्याला चोख प्रत्युत्तर दिले. यास्तिकाचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यास्तिका भाटिया ही गेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांपासून (CWG-2022) भारतीय संघात नाहीये. तसेच ती भारतीय महिला टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा भाग नाही.   इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत यास्तिका राखीव यष्टिरक्षक म्हणून संघाचा भाग होती. होव येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यास्तिकाने 50 धावांची दमदार खेळी केली होती पण टी-20 मालिकेत तिला संधी मिळाली नाही. आशिया चषकासाठीही तिला संघाबाहेर ठेवण्यात आले. यास्तिकाने आतापर्यंत एक कसोटी, 19 एकदिवसीय आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून संघासोबत नसल्याने तिच्यावर टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, एका ट्रोलरला यास्तिकाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. यास्तिकाच्या ट्विटला उत्तर देताना एका ट्रोलरने, तिने टी-20 क्रिकेट खेळू नये असे म्हटले होते. तू टी-20 खेळू नकोस असेही या युजरने म्हटले होते. मात्र, यावर यास्तिकाने शांत न बसता सडेतोड उत्तर दिले. 'मग मी तुमच्याप्रमाणे घरी बसून कमेंट पास करू का? असे उत्तर यास्तिकाने दिले.

दरम्यान,  या उत्तरासोबत तिने हसणारा इमोजीही शेअर केला आहे. यास्तिकाचे हे ट्विट 100 हून अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे.