John Cena announces retirement from WWE : यू कॅन्ट सी हिम...! होय तुम्ही त्याला पाहू शकणार नाही. थ्री फोर्थ बुरमुडा.. नेव्हर गिव्ह अपचा विना कॉलरचा टी-शर्ट आणि हातात दोन बॅन्ड.. डोक्यावर 'यू कॅन्ट सी मी' असा लोगो असलेली टोपी.. पिळदार शरीर अन् 56 इंचाची छाती, असं वर्णन केल्यावर एक चेहरा समोर येतो, तो जॉन सीना..! आता याच जॉन सीना याला WWE च्या आखाड्यात राहता येणार नाहीये. जॉन सीना याने WWE मधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2025 हे व्यावसायिक WWE चं अखेरचं वर्ष असेल, असं जॉन सीना याने म्हटलं आहे.
तब्बल 13 वेळा WWE चॅम्पियनशीप आणि 3 वेगवेगळ्या प्रसंगी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिपचं विजेतेपद जिंकणाऱ्या जॉन सीनाने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली. 'आज रात्री मी WWE मधून माझ्या निवृत्तीची अधिकृत घोषणा करत आहे. 2025 मधील रेसलमेनिया 41 हा त्याचा शेवटचा सामना असेल', असं जॉन सीना याने म्हटलं आहे. जॉन सीनाने टोरंटोमध्ये मनी इन द बँक प्रीमियम लाइव्ह इव्हेंट दरम्यान ही घोषणा केली.
लाखो लोकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा जॉन सीना मनी इन द बँक आणि रॉयल रंबल या स्पर्धेता देखील विजेता आहे. एक काळ असा होता, जेव्हा पोरं पहाटे 4:30 वाजता उठून मॅच पाहत असायची. त्याच्या बॉडीबिल्डिंगने तर अनेकांना वेड लावलं होतं. आता जॉन सीना WWE नंतर हॉलिवूडमध्ये आपलं करियर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मनी इन द बँक प्रीमियम लाइव्ह इव्हेंटवेळी जॉन सीना याने द लास्ट टाइम इज नाऊ असा मथळा लिहिलेला शर्ट घातला होता.
दरम्यान, जॉन सीना लवकरच निवृत्ती घेईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, काही दिवसांपूर्वी 50 वर्षांपूर्वी ऑस्कर सोहळ्यात जॉन सीना पीके स्टाईलमध्ये पोहोचला होता. एका लिफाफ्यात विजेत्याचं नाव लिहून याच लिफाफ्यामध्ये प्रायव्हेट पार्ट झाकून त्याने मंचावर हजेरी लावली होती. त्यावेळी त्याची चर्चा खूप झाली होती. त्याचवेळी जॉन सीना हॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल, अशी चर्चा देखील झाली होती.